

तेल अवीव : केस सरळ आणि चमकदार करण्यासाठी वापरल्या जाणार्या ‘फॉर्मल्डिहाईडमुक्त’ उत्पादनांकडे एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या काही वैद्यकीय प्रकरणांनी या उत्पादनांच्या सुरक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या उत्पादनांमुळे किडनीला गंभीर इजा होण्याचा धोका असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे, ज्यामुळे सौंदर्य उद्योगात खळबळ उडाली आहे.
हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंग उत्पादनांमध्ये फॉर्मल्डिहाईड (Formaldehyde) किंवा त्याचे द्रवरूप फॉर्मेलिन (Formalin) आणि मिथिलीन ग्लायकोल (Methylene Glycol) यांचा वापर प्रामुख्याने दोन कारणांसाठी केला जातो. एक म्हणजे, ते उत्पादनाचे शेल्फ लाईफ वाढवते आणि दुसरे म्हणजे, ते केसांचा पोत (texture) दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या गंभीर धोक्यांमुळे अनेक देशांनी हेअर स्ट्रेटनिंग उत्पादनांमधील या रसायनावर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे.
हेअर ट्रीटमेंटदरम्यान जेव्हा या उत्पादनांना उष्णता दिली जाते, तेव्हा फॉर्मल्डिहाईड वायूच्या रूपात हवेत मिसळतो. यामुळे अनेक तत्काळ समस्या उद्भवू शकतात. जसे की, त्वचेवर जळजळ किंवा खाज, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ. या तात्पुरत्या समस्यांव्यतिरिक्त, वारंवार फॉर्मल्डिहाईडच्या संपर्कात आल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम, दमा आणि ल्युकेमिया व नासोफरीन्जियल कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
फॉर्मल्डिहाईडच्या या धोक्यांमुळे ‘फॉर्मल्डिहाईडमुक्त’ उत्पादने बाजारात सुरक्षित पर्याय म्हणून लोकप्रिय झाली; पण ‘क्लिनिकल टॉक्सिकोलॉजी’ नावाच्या जर्नलमध्ये 28 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अहवालानुसार, ही उत्पादने पूर्णपणे निरुपद्रवी नाहीत. या अहवालात विशेषतः ‘ग्लायऑक्सिलिक अॅसिड’ नावाच्या घटकामुळे किडनीला होणार्या संभाव्य इजेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेक फॉर्मल्डिहाईडमुक्त हेअर स्ट्रेटनिंग उत्पादनांमध्ये केस सरळ करण्यासाठी हा घटक वापरला जातो.
या अहवालात तेल अवीवमधील सोरास्की मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतलेल्या 13 महिला आणि किशोरवयीन मुलींच्या प्रकरणांचा तपशील दिला आहे. या सर्वांनी वेगवेगळ्या सलूनमध्ये फॉर्मल्डिहाईडमुक्त उत्पादनांनी हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट घेतली होती. या ट्रीटमेंटनंतर दोन ते 72 तासांच्या आत त्यांना त्रास जाणवू लागला होता. अभ्यास लेखक लिहितात, ‘हे अभ्यास प्रसिद्ध होण्यापूर्वीच, आमच्या वैद्यकीय विषविज्ञान सेवेला अशाच प्रकारच्या तक्रारी मिळू लागल्या होत्या. यामुळे आम्ही स्थानिक हेअर सलूनला, अगदी रुग्णांनी उल्लेख केलेल्या अवैध सलूनलाही भेट दिली, जिथे आम्हाला हेअर स्ट्रेटनिंग उत्पादनांमध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड आढळले.’