T-Rex Footprints | ६.६ कोटी वर्षांपूर्वीच्या महाकाय ‘टी-रेक्स’च्या पावलांचे ठसे उजेडात

नॉर्थ डकोटामध्ये ऐतिहासिक शोध
T-Rex Footprints |
T-Rex Footprints | ६.६ कोटी वर्षांपूर्वीच्या महाकाय ‘टी-रेक्स’च्या पावलांचे ठसे उजेडात
Published on
Updated on

वॉशिंग्‍टन : अमेरिकेतील नॉर्थ डकोटा येथे शास्त्रज्ञांच्या एका पथकाला पूर्ण वाढ झालेल्या महाकाय ‘टायरानोसॉरस रेक्स’ (टी-रेक्स) डायनासोरच्या पावलांची पहिली ज्ञात सलग मालिका शोधण्यात यश आले आहे. सुमारे ६ कोटी ६५ लाख वर्षांपूर्वीचे हे ठसे ‘हेल क्रीक फॉर्मेशन’ या प्रसिद्ध जीवाश्म क्षेत्रात आढळले आहेत.

अमेरिकेतील 'डेन्व्हर म्युझियम ऑफ नेचर अँड सायन्स' आणि ब्रिटनच्या 'लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी'च्या संशोधकांनी हा शोध लावला असून, नुकताच एका आंतरराष्ट्रीय विज्ञान मासिकात याविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यापूर्वी टी-रेक्सचे केवळ तुरळक किंवा लहान पिल्लांच्या पावलांचे ठसे सापडले होते; मात्र एका वयस्क टी-रेक्सच्या चालण्याची सलग मालिका सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

२३ फूट लांब चालण्याचा मार्ग

हा संपूर्ण ट्रॅकवे सुमारे २३ फूट लांब असून यात प्रत्येकी तीन बोटे असलेले एकूण चार ठसे (दोन डावे आणि दोन उजवे) आहेत. प्रत्येक पावलाचा ठसा सुमारे ३ फूट (०.९१ मीटर) लांब असून, दोन पावलांमधील अंतर साधारण १३ फूट आहे. आधुनिक थ्री-डी स्कॅनिंग तंत्रज्ञानावरून संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की, हा डायनासोर ताशी सुमारे ५.६ ते ७.२ किमी वेगाने चालत होता, जो माणसाच्या जलद चालण्याइतकाच आहे.

चालण्या-बोलण्याचा थेट पुरावा

डेन्व्हर म्युझियमचे क्युरेटर टायलर लिसन यांनी सांगितले की, ‘हाडांवरून आपल्याला शरीराची रचना समजते, पण पावलांचे ठसे प्राण्यांच्या प्रत्यक्ष हालचालींची साक्ष देतात. टी-रेक्स कसा चालत होता, हे जाणून घेणे अत्यंत दुर्मीळ आहे.’

हा ऐतिहासिक मार्ग सर्वप्रथम कोलोरॅडो येथील शिक्षक आणि संग्रहालयाचे स्वयंसेवक केंट हप्स यांच्या नजरेस पडला. या चारपैकी तीन ठसे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून पुढील अभ्यासासाठी डेन्व्हर येथील संग्रहालयात जतन केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news