फुटबॉल मैदानाएवढे स्पेस स्टेशन समुद्रात कोसळणार!

मानवी इतिहासातील या अद्भुत निर्मितीचा प्रवास संपवण्याची तयारी
space station
फुटबॉल मैदानाएवढे स्पेस स्टेशन समुद्रात कोसळणार!
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढा आकार, 430 टनांपेक्षा जास्त वजन आणि पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर 28 हजार किलोमीटर प्रतितास वेगाने भ—मण करणारी प्रयोगशाळा... आपण तिला ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’ (International Space Station - ISS) म्हणून ओळखतो. 1998 मध्ये प्रक्षेपित झाल्यापासून आजपर्यंत 26 देशांतील 280 पेक्षा जास्त अंतराळवीरांनी या स्थानकाला भेट दिली आहे; पण आता, मानवी इतिहासातील या अद्भुत निर्मितीचा प्रवास संपवण्याची तयारी ‘नासा’ने सुरू केली आहे. लवकरच हे स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात नियंत्रित पद्धतीने कोसळवण्यात येणार आहे.

जवळपास तीन दशके अविरत सेवा दिल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची रचना कमकुवत होऊ लागली आहे. त्याचे प्राथमिक भाग, जसे की मॉड्यूल्स, ट्रस (मुख्य सांगाडा) आणि रेडिएटर्स जुने झाले आहेत. ‘नासा’च्या अहवालानुसार, 2030 नंतर या स्थानकाचे संचालन करणे अत्यंत धोकादायक आणि प्रचंड खर्चिक ठरू शकते. त्यामुळे, अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर, या स्थानकाला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पेस स्टेशनला प्रशांत महासागरातील ‘पॉइंट निमो’ नावाच्या ठिकाणी पाडण्यात येणार आहे. हे ठिकाण पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि निर्जन जागा म्हणून ओळखले जाते. पॉईंट निमो हे दक्षिण प्रशांत महासागरात आहे. न्यूझीलंडच्या पूर्व किनार्‍यापासून सुमारे 3,000 मैल आणि अंटार्क्टिकापासून 2,000 मैल दूर असलेल्या या ठिकाणी मानवी वस्ती तर सोडाच; पण पक्षीही फिरकत नाहीत. अनेक वर्षांपासून निवृत्त झालेले उपग्रह आणि निकामी झालेली अवकाशयाने याच ठिकाणी पाडली जातात. त्यामुळे या जागेला ‘अवकाशयानांची स्मशानभूमी’ असेही म्हटले जाते. ISS चे संचालन ‘नासा’ (अमेरिका), रॉसकॉसमॉस (रशिया), ईएसए (युरोप), जेएक्सए (जपान) आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी या पाच प्रमुख अंतराळ संस्था मिळून करतात. आता या स्थानकाला सुरक्षितपणे कक्षेतून बाहेर काढण्याची (डिऑर्बिट) जबाबदारीही याच संस्थांवर आहे. 150 अब्ज डॉलर्स खर्चून बनवलेल्या या स्पेस स्टेशनला नियंत्रित करण्यासाठी ‘स्पेसएक्स’ कंपनी एक विशेष ‘डिऑर्बिट व्हेईकल’ तयार करणार आहे. हे यान स्पेस स्टेशनला नियंत्रित करत पॉईंट निमोपर्यंत घेऊन जाईल आणि तिथेच या 30 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा अंत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news