गुवाहाटी : प्रचंड जीवनेच्छा, जिद्द आणि आनंदी वृत्ती असेल तर माणूस मोठ्या अडचणींवरही मात करून पुढे जाऊ शकतो. आसाममधील 21 वर्षांची प्रिन्सी गोगोई ही तरुणी अशीच आहे. तिला जन्मतःच दोन्ही हात नाहीत. मात्र, पायांच्या सहाय्याने वेगवेगळी कामे करणे तिने काळाच्या ओघात शिकून घेतले. पायांच्या बोटांमध्ये ब्रश धरून ती सुंदर चित्रेही काढते. तिच्या अशाच एका चित्राला आता तीस हजार रुपयांची किंमत मिळाली आहे.
आसामच्या सोनारी या छोट्याशा शहरात जन्मलेल्या प्रिन्सीने सांगितले, अडचणी कुणाच्या आयुष्यात नाहीत? मला तर दोन्ही हात देण्याचे देव विसरला! मात्र तरीही मी पायांच्या आधारे जगणे शिकले. तिला एका सरकारी शाळेत पाचवीसाठी प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, गावातील एका व्यक्तीच्या मदतीने तिला एका खासगी शाळेत प्रवेश मिळाला व या शाळेतूनच पुढे तिने दहावीची परीक्षाही उत्तीर्ण केली. पायानेच उत्तरपत्रिका लिहून ती बारावीही उत्तीर्ण झाली. सध्या ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करून उपजीविका करीत आहे. पायाच्या बोटांमध्ये ब्रश धरून तिने आतापर्यंत अनेक प्रकारची चित्रे बनवली आहेत. त्यापैकीच एका चित्राची 30 हजार रुपयांमध्ये विक्री झाली. दिव्यांग मुलांसाठी कला विद्यालय सुरू करण्याची तिची इच्छा आहे.