

झोप न येणे ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे. जेव्हा सर्व जग सुखाची झोप घेत असते, तेव्हा एकटे जागे राहणे केवळ कंटाळवाणेच नाही, तर आरोग्यासाठीही हानिकारक ठरते; पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या अपुऱ्या झोपेचे कारण शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. मॅग्नेेशियम शरीरातील ‘मेलाटोनिन’ हार्मोन नियंत्रित करण्यास मदत करते, जे गाढ झोपेसाठी अत्यंत आवश्यक असते. जर तुम्हालाही रात्री वेळेवर झोप येत नसेल, तर खालील तीन पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरेल, असे तज्ज्ञ सांगतात.
केळी : केळ्यामध्ये पोटॅशियम असते हे सर्वांनाच माहीत आहे; पण त्यात मॅग्नेशियमचे प्रमाणही भरपूर असते. केळ्याचे सेवन केल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे शरीर शांत होऊन गाढ झोप लागण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून तुम्ही केळे खाऊ शकता.
बदाम : चांगल्या झोपेसाठी दररोज किमान 5 बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे मानसिक ताण कमी होतो. अनेकदा अतिविचार किंवा तणावामुळे झोप उडते; अशावेळी बदाम खाणे गुणकारी ठरते.
भोपळ्याच्या बिया : जर तुम्ही बऱ्याच काळापासून निद्रानाशाच्या समस्येशी झुंजत असाल, तर भोपळ्याच्या बिया हा एक उत्तम पर्याय आहे. यात असलेल्या मॅग्नेेशियममुळे शरीरात ‘सेरोटोनिन’ हार्मोनची निर्मिती होण्यास मदत होते. हे हार्मोन झोप येण्यासोबतच, तुमचा मूड सुधारण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.