अहमदाबाद : आपल्या देशात अनेक अनोखी गावं आहेत. संस्कृत बोलणारे गाव, जुळ्यांचे गाव, श्रीमंत गाव, घराला दारे नसणारे गाव अशी ओळख असणारी ही काही गावं आहेत. गुजरातमध्येही असेच एक गाव आहे. या गावातील घरात स्वयंपाकघर नाही. याचा अर्थ या गावातील घरांमध्ये अन्न शिजवले जात नाही. आता घरात अन्न शिजवले जात नाही, याचा अर्थ असा नव्हे की गावातील लोक उपाशीच असतात! या गावात सर्वांसाठी एकत्रच अन्न शिजवले जाते व सर्व गावकरी नाश्ता व दोन्ही वेळेचे जेवण एकत्रच घेतात! या गावाचे नाव आहे चंदनकी. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात हे छोटेसे गाव आहे.
या गावात पक्के रस्ते आहेत आणि चोवीस तास वीजही असते. या ठिकाणी इतकी स्वच्छता असते की डास, माशा शोधूनही सापडणार नाहीत! प्रत्येक घरात शौचालय आहे. गावाची लोकसंख्या 1300 आहे. त्यापैकी 900 लोक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अहमदाबाद किंवा अगदी अमेरिकेतही गेलेले आहेत. त्यामुळे गावात केवळ वयस्कर लोकच बहुतांश संख्येने आहेत. या वृद्ध लोकांचा एकाकीपणा दूर व्हावा, तसेच त्यांचे काम हलके व्हावे यासाठी गावात एक अनोखी योजना अंमलात आणली गेली. या योजनेनुसार गावातील कुणीही आपल्या घरात जेवण बनवायचे नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण एकाच मोठ्या स्वयंपाकघरात शिजवले जाते. हे अन्न गावातील शंभरभर वृद्ध लोक एका जागी एकत्र बसून आनंदाने खातात. एखाद्या घरात पाहुणे मंडळी आली तरी त्यांच्या नाश्ता व जेवणाची सोयही या ठिकाणीच होते. जेवण्याच्या वेळी सर्वात आधी महिला जेवतात मग पुरुष. अगदी सणावारीही असेच सामुदायिक जेवण होते. गावातील लोकांसाठी आरोग्यवर्धक व स्वादिष्ट जेवण एका सामुदायिक भोजनकक्षात बनवले जाते. या गावाला स्वच्छ गाव, तीर्थ गाव असे काही पुरस्कारही मिळालेले आहेत. गावातील एकी, नीटनेटके नियोजन, स्वच्छता यांचे नेहमी कौतुक होत असते.