Flying Electric Cars | अमेरिकेत पोलिसांच्या ताफ्यात आता उडणारी इलेक्ट्रिक कार

Flying Electric Cars |
Flying Electric Cars | अमेरिकेत पोलिसांच्या ताफ्यात आता उडणारी इलेक्ट्रिक कार
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : ऑटोमोबाईल क्षेत्रात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असून, जगभरातील कंपन्या आता हवेत उडणाऱ्या वाहनांवर वेगाने काम करत आहेत. अलीकडेच ‘टेस्ला’ने आपल्या पहिल्या उडणाऱ्या इलेक्ट्रिक कार ‘रोडस्टर’चे प्रोटोटाइप सादर केले होते. मात्र, अशा प्रकारच्या उडणाऱ्या गाड्या केवळ सर्वसामान्य नागरिकांपुरत्या मर्यादित न राहता, आता पोलिसांच्या ताफ्यातही दाखल होणार आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ‘फ्लोरिडा पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी’च्या पोलिस विभागाने हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा वापर करण्याची तयारी केली आहे.

विद्यापीठ परिसरात गस्त घालण्यासाठी आणि आणीबाणीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी पोलिस ‘जेटसन वन’ (Jetson ONE) नावाच्या इलेक्ट्रिक एअरक्राफ्टचा वापर करणार आहेत. या विमानाला ‘ॲस्ट्रो’ (Astro) म्हणूनही ओळखले जाते. सुरक्षा आणि दैनंदिन गस्तीसाठी अशा प्रकारची वैयक्तिक उडणारी गाडी आपल्या ताफ्यात सामील करणारा हा जगातील पहिलाच पोलिस विभाग ठरला आहे. या उडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाची निर्मिती कॅलिफोर्नियास्थित ‘जेटसन’ या कंपनीने केली आहे. हे एक ‘ई-व्हिटॉल’ (eVTOL - इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग) तंत्रज्ञानावर आधारित एअरक्राफ्ट आहे.

हेलिकॉप्टरप्रमाणेच हे एकाच जागेवरून थेट हवेत उभे उड्डाण करू शकते आणि त्याच पद्धतीने खाली उतरू (लँडिंग) शकते. दरम्यान, प्रत्यक्ष पोलिस मोहिमांमध्ये याचा वापर सुरू करण्यापूर्वी अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ची (FAA) अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळणे बाकी आहे. व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग तंत्रज्ञानामुळे हे एअरक्राफ्ट अशा चिंचोळ्या, दुर्गम अथवा खडतर भागांतही सहज पोहोचू शकेल, जेथे पोलिसांची सामान्य वाहने जाऊ शकत नाहीत. पोलिसप्रमुख ॲरॉन मरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ किंवा प्रतिकूल हवामानाच्या काळात आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी हे विमान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या एअरक्राफ्टसाठी जगभरात तीन वर्षांची मोठी प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) असतानाही कंपनीने विद्यापीठाच्या मागणीला प्राधान्य दिले आहे. विद्यापीठ पोलिस स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने आणीबाणीच्या प्रसंगी याचा वापर करणार आहेत. खराब रस्ते किंवा हवामानामुळे ज्या भागांत पोलिसांची गस्त पोहोचू शकत नव्हती, तेथे आता या हवेतून उडणाऱ्या वाहनामुळे लक्ष ठेवणे शक्य होणार असून, सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल.

logo
Pudhari News
pudhari.news