

वॉशिंग्टन ः ‘अॅलेफ एरोनॉटिक्स’ या कंपनीने विकसित केलेली ’अॅलेफ मॉडेल ए’ ही रस्त्यावर धावणारी आणि आकाशातही उडणारी नवीन कार लवकरच वास्तवात येण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे. ’प्युकारा एरो’ आणि ’एमवायसी’ या एअरोस्पेस कंपन्यांसोबतच्या करारामुळे ही कार उत्पादनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. लवकरच ही इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होऊ शकते.
’अॅलेफ मॉडेल ए’ ही 100 टक्के इलेक्ट्रिक असून, थेट उभे टेकऑफ आणि लँडिंग करण्यास सक्षम आहे. या कारचे चेसिस 90 अंश फिरू शकते, ज्यामुळे ती एक स्थिर पंखासारखी कार्यरत होते. कारचा बॉडी स्ट्रक्चर जाळीसारखा असल्याने, उड्डाणाच्या वेळी हवेचा प्रवाह व्यवस्थित होतो. तसेच, गाडीच्या ‘कॉकपिट‘ विभागात बसलेला चालक स्थिर राहतो. ‘लांब अंतर प्रवासासाठी योग्य एअरोडायनॅमिक डिझाईन आवश्यक आहे. जेव्हा कार उड्डाणासाठी झुकते, तेव्हा ती दोन पंखांच्या स्वरूपात कार्य करते, ज्यामुळे ती अधिक कार्यक्षम आणि बॅटरी वाचवणारी ठरते,‘ असे ’अॅलेफ एरोनॉटिक्स’ चे सीईओ जिम डुखोव्हनी यांनी स्पष्ट केले. या कारचा रस्त्यावरील वेग ताशी 40 किलोमीटर असेल. काही ठिकाणच्या महामार्ग नियमांनुसार हा वेग खूपच कमी आहे. आकाशात ही कार ताशी 177 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकते. रस्त्यावरील प्रवास एका चार्जवर 321 किलोमीटरचा असेल. हा प्रोटोटाइप टॅक्सी किंवा प्रवासी वाहन म्हणून नव्हे, तर वैयक्तिक प्रवासासाठी डिझाइन केला आहे. ’अॅलेफ एरोनॉटिक्स’ची स्थापना 2015 मध्ये झाली आणि त्याच वर्षी त्यांनी या प्रकारची कार 6 महिन्यांत तयार करण्याचा विचार केला. मात्र, प्रत्यक्षात 2019 मध्येच पहिल्या पूर्ण-प्रमाणातील प्रोटोटाइपचे उड्डाण यशस्वी झाले. ही कार बाजारात कधी उपलब्ध होईल याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण रस्ते आणि आकाश दोन्ही माध्यमांमध्ये प्रवास शक्य करणार्या वाहनांचे भविष्य यातून दिसू लागले आहे!