China Flying Car | आता चीनमध्ये हवेत झेपावणारी कार!

China Flying Car |
China Flying Car | आता चीनमध्ये हवेत झेपावणारी कार!
Published on: 
Updated on: 

बीजिंग : काही काळापूर्वी एलन मस्क यांनी आपली उडणारी टेस्ला रोडस्टर दाखवून संपूर्ण जगाला चकित केले होते आणि आता चीननेही या शर्यतीत धमाकेदार प्रवेश केला आहे. चीनने चांग्शा शहरात स्वतः तयार केलेल्या, पंख नसलेल्या ‘फ्लाईंग कार’चे पहिले यशस्वी चाचणी उड्डाण (टेस्ट फ्लाइट) पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, या कारला हवेत झेपावण्यासाठी कोणत्याही लांबलचक धावपट्टीची (रनवे) गरज भासत नाही. एखाद्या ड्रोन किंवा हेलिकॉप्टरप्रमाणे ही कार आपल्या जागेवरून थेट वर उचलली जाते आणि तिथेच खाली उतरते. मात्र, चीनने टेस्लाची नक्कल केल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर तसे नाही. या दोन्ही कारच्या उड्डाणाचे तंत्रज्ञान वेगवेगळे आहे.

चीनच्या चांग्शा शहरात या सिंगल-सीट कॉम्पॅक्ट फ्लाईंग कारची पहिली चाचणी घेण्यात आली. भारतातील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या उड्डाणाचा व्हिडीओ शेअर केला, त्यानंतर तंत्रज्ञानप्रेमींमध्ये याबाबतची चर्चा अधिकच रंगली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, ही लहानशी कार पक्क्या रस्त्यावर उभी आहे आणि त्यानंतर हळूहळू हवेत वर जाते. काही वेळ हवेत स्थिर राहून आपली जागा बदलल्यानंतर ती अत्यंत सहजपणे पुन्हा खाली उतरते. या संपूर्ण चाचणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही रनवेचा वापर करण्यात आलेला नाही.

सर्वसाधारणपणे विमानाला उड्डाण घेण्यासाठी लांबपट्टी लागते; मात्र ही गाडी उभ्या दिशेने टेक-ऑफ आणि लँडिंग (व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग) करू शकते. तिचे एकूण टेक-ऑफ वजन २८० किलोग्रॅम असून, ती स्वतःसोबत १२० किलोग्रॅमपर्यंतचा भार उचलू शकते. अनेकदा आपण कोणत्याही फ्लाईंग कार किंवा मोठ्या ड्रोनची कल्पना करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गाडीच्या वर किंवा बाजूंना बसवलेले मोठे फिरणारे ब्लेडस्‌ येतात. मात्र, चीनच्या अभियंत्यांनी येथे एक वेगळीच शक्कल लढवली आहे. या कारच्या बाहेरच्या बाजूला कोणताही फिरणारा पंखा किंवा पंख दिसत नाही. त्याऐवजी, तिच्या आत ‘मल्टी-स्टेज थ्रस्ट-वेक्टरिंग डक्टेड फॅन सिस्टीम’ बसवण्यात आली आहे.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, कारच्या सांगाड्याच्या आतच अनेक शक्तिशाली पंखे लपवून बसवण्यात आले आहेत. हे पंखे सुरू झाल्यावर ते हवेला अत्यंत वेगाने खालच्या दिशेने ढकलतात, ज्यामुळे कारला वर उचलण्याची शक्ती म्हणजेच ‘लिफ्ट’ मिळते. याच पंख्यांमधून बाहेर पडणाऱ्या हवेच्या दिशेवर नियंत्रण ठेवून कार हवेत एका जागी स्थिर राहू शकते तसेच पुढे-मागे किंवा डावी-उजवीकडे वळू शकते. या रचनेचा सर्वात मोठा फायदा सुरक्षेच्या दृष्टीने होतो. शहरातील गजबजलेल्या भागांत कमी उंचीवरून उड्डाण करताना उघड्या ब्लेडस्‌मुळे कोणीही जखमी होण्याचा किंवा तारांमध्ये अडकण्याचा धोका असतो. पंखे कारच्या आत बंदिस्त ठेवल्याने हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.