

वॉशिंग्टन ः जगभरात सध्या अनेक कंपन्या उडणार्या मोटारींवर काम करीत आहेत. चित्रपटांमध्ये आपण अनेकदा उडणार्या मोटारी पाहिल्या आहेत, पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे! अमेरिकेतील ‘अलेफ एरोनॉटिक्स’ कंपनीने जगातील पहिली उडणारी कार ‘मॉडेल झिरो’चे व्हिडीओ प्रसिद्ध केले आहे. या व्हिडीओमध्ये ही कार रस्त्यावरून थेट हवेत उडताना दिसत आहे.
ही कार (VTOL ( Electric Vertical Takeoff and Landing) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, याचा अर्थ तिला उड्डाणासाठी धावपट्टीची (Runway) गरज नाही. साध्या गाडीप्रमाणे रस्त्यावर चालत असतानाच ती थेट आकाशात उडू शकते. या कारचे डिझाइन एखाद्या सामान्य कारसारखे दिसते, त्यामुळे ती इतर फ्लाइंग कार्सपेक्षा वेगळी ठरते. ही एक इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आहे, जी ड्रोनप्रमाणे थेट वरच्या दिशेने उड्डाण करू शकते. या कारमध्ये 8 मोटराइज्ड रोटर्स आहेत जे कारच्या बॉडीमध्ये लपलेले असतात. कारचे विशेष मेश डिझाइन कारला हवेत संतुलित ठेवते. या कारचा कमाल वेग रस्त्यावर 40 किमी/तास तर आकाशात 160 किमी/तास आहे. कारच्या बॅटरीची रेंज रस्त्यावर 320 किमी असून आकाशात 160 किमी आहे. या कारची किंमत सुमारे 2.62 कोटी रुपये असून, आतापर्यंत 3,330 पेक्षा जास्त ऑर्डर मिळाले आहेत. कंपनीने जाहीर केले आहे की 2025 पासून ‘मॉडेल ए’ चे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होईल. यानंतर, 2035 पर्यंत कंपनी चार-सीटर ‘मॉडेल झेड’ लाँच करण्याची योजना आखत आहे.