

मॅसॅच्युसेटस् : सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर चालणार्या आणि स्वतःच हवेत तरंगणार्या उपकरणांची (self- lofting devices) प्रथमच पृथ्वीच्या वरच्या वातावरणासारख्या निर्वात-सद़ृश (near- vacuum) परिस्थितीत यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या यशामुळे वातावरणीय विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे छोटे, वजनाने हलके असे पडदे अॅल्युमिनियम ऑक्साईड आणि क्रोमियमच्या थरापासून बनवलेले असतात. ते ‘फोटोफोरेसिस’ नावाच्या शास्त्रीय तत्त्वाचा वापर करतात.
फोटोफोरेसिस तत्त्वानुसार, जेव्हा पातळ पदार्थाची एक बाजू दुसर्या बाजूच्या तुलनेत जास्त गरम होते, तेव्हा वायूचे रेणू गरम बाजूला आदळून त्या पडद्याला वरच्या दिशेने ढकलतात. मात्र, हा प्रभाव खूपच क्षीण असतो आणि त्यामुळे तो केवळ अंतराळाच्या सीमेवरील भागासारख्या अत्यंत कमी दाबाच्या वातावरणातच दिसून येतो. ‘नेचर’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये 13 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात या ताज्या प्रयोगाचे वर्णन करण्यात आले आहे. या प्रयोगात, संशोधकांनी 0.4 इंच (1 सेंटीमीटर) रुंदीचे सूक्ष्म कण एका व्हॅक्यूम चेंबरमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या सुमारे 55 टक्के तीव्रतेच्या प्रकाशात तरंगवून दाखवले.
या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आणि हार्वर्ड जॉन ए. पॉलसन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस (SEAS) येथील संशोधक, बेन शेफर म्हणाले, ‘हे एक मोठे यश आहे. यावरून हे सिद्ध होते की, हे तंत्रज्ञान पृथ्वीच्या वरच्या वातावरणात असलेल्या परिस्थितीत खरोखरच काम करू शकते.’ या तंत्रज्ञानामुळे वातावरणाच्या त्या भागाचा अभ्यास करणे शक्य होईल, जिथे आजपर्यंत पोहोचणे अशक्य होते. शेफर यांनी सांगितले, ‘आपण वातावरणाच्या अशा क्षेत्राबद्दल बोलत आहोत, ज्याला कधीकधी ‘इग्नोरॉस्फिअर’ म्हणजे ‘अज्ञात मंडल’ म्हटले जाते, कारण तिथे सध्या कोणतेही उपकरण उडू शकत नाही. त्या ठिकाणी काहीतरी पाठवण्याची क्षमता मिळाल्यास, सध्या उपलब्ध असलेल्या माहितीपेक्षा अधिक अचूक डेटा गोळा करणे आपल्याला शक्य होईल.’