

माद्रिद : स्पेनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका संपन्न महिलेच्या थडग्यात मण्यांचा एक मोठाच साठा सापडला आहे. हे मणी 2 लाख 70 हजार इतके असून, ते या महिलेच्या पोशाखाला सजवण्यासाठी वापरण्यात आले होते. हे मणी शंख-शिंपल्यांसारख्या कठीण कवचांपासून बनवलेले आहेत. अशा प्रकारच्या मण्यांचा हा जगातील सर्वात मोठा साठा ठरला आहे.
संपन्न कुटुंबातील महिलेचे हे थडगे आहे. या महिलेचा पोशाख हस्तिदंत तसेच अम्बर (झाडाचा घट्ट झालेला जुना डिंक) यापासून बनवलेल्या कलाकृतींनी सजवलेला आहे. तत्कालीन उच्चभ्रू महिलांसाठी अशा प्रकारचे पोशाख व पेंडंटस् बनवले जात होते, हे यावरून दिसते. या थडग्याचा शोध 2010 आणि 2011 दरम्यान, सेविलीपासून 6 किलोमीटरवरील वॅलेन्सिना येथे सापडले होते. त्याला ‘मोंटेलिरिओ थोलोस बरिअल’ या नावाने ओळखले जाते. वॅलेन्सिना हे ठिकाण ताम्रयुगातील वसाहतीचे एक मोठे ठिकाण आहे. हे थडगे इसवी सनपूर्व 2800 ते इसवी सनपूर्व 2600 या काळातील आहे. या थडग्यात पुरातत्त्व संशोधकांना आठ सांगाडे आढळले. त्यापैकी सात सांगाडे हे महिलांचे आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सेविलीमधील पुरातत्त्व संशोधक सॅम्युएल रॅमिरेज-क्रुझेडो यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्याची माहिती ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.