

नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेला अनेक जण महत्त्व देत नाहीत. कामाचा ताण असो किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, अनेक लोकांची पुरेशी झोप होत नाही; पण झोपेची कमतरता तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? विशेषतः वृद्धांसाठी कमी झोप अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्या 5 गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, हे जाणून घ्या.
हृदय : पुरेशी झोप न घेतल्याने हृदयावर थेट परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढू शकतो. परिणामी, हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जास्त दाब येतो. दीर्घकाळ असे झाल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांचा धोका खूप वाढतो. वृद्धांमध्ये आधीपासूनच हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असल्याने झोपेची कमतरता त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
मधुमेह : झोपेची कमतरता शरीराच्या ग्लुकोज हाताळण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा तुमचे शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ही स्थिती हळूहळू टाईप-2 मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते. वृद्धांमध्ये चयापचय क्रिया मंद असल्याने हा धोका आणखी वाढतो. मानसिक आरोग्य ः झोपेच्या कमतरतेचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. पुरेशी झोप न घेतल्याने ताण, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या वाढू शकतात. याचा स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवरही परिणाम होतो. वृद्धांमध्ये एकटेपणा आणि सामाजिक अलिप्तता जाणवण्याची शक्यता असते. झोपेची कमतरता या नकारात्मक भावनांना आणखी वाढवू शकते.
रोगप्रतिकारकता : झोपेच्या वेळी आपले शरीर सायटोकाईन्स नावाचे प्रोटिन तयार करते आणि ते सूज आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा या संरक्षक सायटोकाईन्सचे उत्पादन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या कमकुवत असते. त्यामुळे झोपेची कमतरता त्यांना संक्रमणांसाठी अधिक संवेदनशील बनवते.
वजन वाढ : झोपेची कमतरता आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवणार्या हार्मोन्सनादेखील प्रभावित करते. कमी झोप घेतल्याने घ्रेलिन या भूक वाढवणार्या हार्मोनची पातळी वाढते आणि लेप्टिन या भूक कमी करणार्या हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे जास्त भूक लागते आणि अनावश्यक खाण्याची सवय लागते. परिणामी, लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. वृद्धांमध्ये शारीरिक हालचाली कमी असल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.