Ancient Fish Hunting | 5000 वर्षांपूर्वीही होत असे देवमाशांची शिकार!
बार्सिलोना : दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये संशोधकांना 5,000 वर्षांपूर्वीचे देवमाशांच्या (व्हेल) हाडांपासून बनवलेले भाले सापडले आहेत. या शोधामुळे हे सिद्ध झाले आहे की, केवळ उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशातील लोकच नव्हे, तर ब्राझीलमधील आदिवासी गट देखील प्राचीन काळी देवमाशांची सक्रिय शिकार करत होते.
9 जानेवारी रोजी ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या शोधपत्रिकेत हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. बार्सिलोना स्वायत्त विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि अभ्यासाचे सह-लेखक आंद्रे कार्लो कोलोनेस यांनी सांगितले की, हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. मूळतः हे संशोधक दक्षिण ब्राझीलमधील ‘सांबाकी’ (Sambaqui) या स्थानिक लोकांच्या समुदायाने वापरलेल्या सागरी प्रजातींची माहिती गोळा करत होते. संशोधनादरम्यान संग्रहालयातील एका क्युरेटरने काही लाकड्यांसारख्या दिसणार्या वस्तू बाहेर काढल्या. मात्र, त्यांची विशिष्ट रचना पाहून त्या वस्तू ‘हारपून’ किंवा शिकारीचे भाले असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. हे भाले ‘हमपबॅक’ आणि ‘सदर्न राइट व्हेल’ या देवमाशांच्या बरगड्यांपासून बनवण्यात आली होती.
कार्बन डेटिंगनुसार, ही हत्यारे 4,710 ते 4,970 वर्षे जुनी आहेत. आर्क्टिक प्रदेशात सापडलेल्या पुराव्यांपेक्षा हे भाले 1,000 वर्षांनी जुने असून, जगातील देवमाशांच्या सक्रिय शिकारीचा हा सर्वात जुना पुरावा मानला जात आहे. प्राचीन लोकांसाठी देवमासे हे केवळ अन्नाचे साधन नव्हते. त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात मांस (मेजवानी), उबदारपणासाठी तेल आणि अवजारे तसेच दागिने बनवण्यासाठी हाडे उपलब्ध होत असत. समुद्रकिनार्यावर वाहून आलेल्या मृत देवमाशांचा वापर मानव सुमारे 20,000 वर्षांपासून करत आहे; परंतु समुद्रात जाऊन त्यांची शिकार करण्याचे पुरावे फार कमी सापडले आहेत.
यापूर्वी दक्षिण कोरियात 6,000 वर्षांपूर्वी हरणांच्या हाडांनी देवमाशांची शिकार केल्याचे पुरावे मिळाले होते; परंतु थेट देवमाशांच्याच हाडांचा वापर करून त्यांची शिकार करण्याची ही पद्धत आणि काळ विज्ञानासाठी नवीन आहे. नेहमीच असा प्रश्न पडतो की, सापडलेली हाडे वाहून आलेल्या देवमाशांची आहेत की, त्यांची शिकार केली होती? संशोधकांच्या मते, या भाल्यांची रचना (ज्यात लाकडी दांडा बसवण्यासाठी पोकळी आणि अणकुचीदार टोके होती) हे स्पष्ट करते की, हे लोक सक्रियपणे समुद्रात जाऊन या महाकाय जीवांची शिकार करत असत.

