

जिनिव्हा : भौतिकशास्त्रज्ञांनी इतिहासात पहिल्यांदाच ‘अँटिमॅटर’ (प्रतिकण) ट्रकद्वारे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यात यश मिळवले आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड मानला जात असून, यामुळे विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्यास मोठी मदत होणार आहे.
जिनिव्हा येथील ‘युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च’ (सर्न) च्या कॅम्पसमध्ये हा अत्यंत नियंत्रित आणि छोटा प्रवास पार पडला. अँटिमॅटर हा जगातील सर्वात नाजूक पदार्थांपैकी एक मानला जातो. या यशस्वी प्रयोगामुळे आता हे सिद्ध झाले आहे की, अँटिमॅटर नष्ट न होता त्याची वाहतूक करणे शक्य आहे. या क्षमतेमुळे आता शास्त्रज्ञ अँटिमॅटरला युरोपमधील अधिक शांत आणि प्रगत प्रयोगशाळांमध्ये नेऊ शकतील, जिथे बाह्य हस्तक्षेपाशिवाय अति-संवेदनशील प्रयोग करणे शक्य होईल. ‘बेस’ (BASE - Baryon Antibaryon Symmetry Experiment) या प्रयोगाचे प्रवक्ते स्टीफन अल्मर यांनी सांगितले की, ‘या यशामुळे ‘सर्न’च्या बाहेर अचूक मापनासाठी एक संपूर्ण नवीन विश्व खुले झाले आहे.’
सध्याच्या सिद्धांतानुसार, ‘बिग बँग’ या महास्फोटाच्या वेळी द्रव्य (मॅटर) आणि प्रतिकण (अँटिमॅटर) समप्रमाणात तयार व्हायला हवे होते. जर असे झाले असते, तर त्यांनी एकमेकांचा विनाश केला असता आणि विश्वात केवळ पोकळी उरली असती. परंतु, आपले द़ृश्य विश्व प्रामुख्याने ‘द्रव्या’ने (मॅटर) बनलेले आहे. या दोघांमधील सूक्ष्म फरक शोधल्यास विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य समजू शकते. ‘सर्न’ गेल्या अनेक दशकांपासून आपल्या ‘अँटिमॅटर फॅक्टरी’मध्ये प्रतिकण तयार करत आहे. परंतु, जिथे हे कण तयार होतात, तिथे मोठ्या प्रमाणात चुंबकीय चढ-उतार असतात, ज्यामुळे अचूक प्रयोग करण्यात अडथळे येतात.
अँटिमॅटरची वाहतूक करणे हे एक मोठे आव्हान होते, कारण अँटिमॅटर जेव्हा साध्या द्रव्याच्या (मॅटर) संपर्कात येते, तेव्हा प्रचंड ऊर्जेसह दोन्हींचा तत्काळ विनाश होतो. याला वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा वापर करून ‘व्हॅक्युम’मध्ये (निर्वात पोकळी) बंदिस्त करतात. स्थिर प्रयोगशाळेत ही स्थिती टिकवणे कठीण असते, तिथे चालत्या ट्रकमध्ये हे साध्य करणे ही विज्ञानाची मोठी किमया आहे.