First Giant Organism on Earth | पृथ्वीवरील पहिला महाकाय सजीव होता 26 फुटी दंडगोलाकार जीव

वनस्पती, बुरशी की शैवाल याबाबत अद्यापही संभ्रम
First Giant Organism on Earth
First Giant Organism on Earth | पृथ्वीवरील पहिला महाकाय सजीव होता 26 फुटी दंडगोलाकार जीव
Published on
Updated on

लंडन : सुमारे 42 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेला आणि जमिनीवर राहणारा पहिला महाकाय जीव म्हणून ओळखला जाणारा ‘प्रोटोवॅक्सिटस्’ (Prototaxites) हा विज्ञानासाठी आजही एक मोठे कोडे ठरत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा जीव सजीवांच्या उत्क्रांतीच्या अशा एखाद्या अज्ञात शाखेचा भाग असू शकतो, ज्याबद्दल आजवर कोणालाही माहिती नव्हती. प्रोटोवॅक्सिटस् हे जीव अत्यंत अवाढव्य होते. त्यांची उंची 26 फूट (8 मीटर) आणि रुंदी 3 फूट (1 मीटर) पर्यंत असू शकत असे. दिसायला ते फांद्या नसलेल्या झाडाच्या खोडासारखे दंडगोलाकार होते. हे जीव साधारणपणे 420 ते 375 दशलक्ष वर्षांपूर्वी ‘डेव्होनियन’ कालखंडात अस्तित्वात होते.

सन 1843 मध्ये या जीवाचा पहिला जीवाश्म सापडल्यापासून, हे नेमके काय आहेत...वनस्पती, बुरशी की शेवाळ, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. 2007 मधील रासायनिक विश्लेषणानुसार, त्यांना ‘महाकाय प्राचीन बुरशी’ मानले गेले होते. मात्र, ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या शोधपत्रिकेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामधून एक खळबळजनक दावा समोर आला आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्याते आणि या अभ्यासाचे सह-लेखक सँडी हेदरिंग्टन यांनी सांगितले की, ‘हे जीव सजीव तर आहेत; पण आपल्याला माहीत असलेल्या स्वरूपातले नाहीत. त्यांची शरीररचना आणि रासायनिक वैशिष्ट्ये बुरशी किंवा वनस्पतींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे ते उत्क्रांतीच्या अशा एका शाखेतील आहेत जी आता पूर्णपणे नष्ट झाली आहे.’

पृथ्वीवरील सर्व सजीवांचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन डोमेनमध्ये (Bacteria, Archaea आणि Eukarya) केले जाते. ‘युकॅर्या’ (Eukarya) मध्ये वनस्पती, प्राणी, बुरशी आणि प्रोटोझोआ यांचा समावेश होतो. मात्र, नवीन संशोधनानुसार प्रोटोवॅक्सिटस् हे यापैकी कोणत्याही गटात बसत नाहीत, तर ते सजीवांचे एक वेगळेच साम—ाज्य (Kingdom) असू शकतात. जरी मागील संशोधनात ते कुजलेल्या पदार्थांवर जगणारे (बुरशीसारखे) आढळले असले, तरी त्यांची आंतरिक रचना कोणत्याही ज्ञात सजीवाशी जुळत नाही. स्कॉटलंडमधील ‘र्‍हाइनी चर्ट’ (Rhynie chert) भागात सापडलेल्या ’प्रोटोवॅक्सिट्स तायटी’ (Prototaxites taiti) या प्रजातीच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विज्ञानाच्या द़ृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या सुरुवातीच्या इतिहासाकडे पाहण्याचा आपला द़ृष्टिकोन बदलू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news