

वॉशिंग्टन : क्वांटम संगणनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत, ‘आयबीएम’ कंपनीच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्रुटी (एरर), दूर केल्याचा दावा केला आहे. ‘आयबीएम’ने जाहीर केले आहे की, 2029 पर्यंत ते जगातील पहिला मोठ्या प्रमाणावर वापरता येणारा, त्रुटीरहित (फॉल्ट-टॉलरंट) क्वांटम संगणक ‘स्टार्लिंग’ बाजारात आणणार आहेत.
‘आयबीएम’च्या नव्या संशोधनानुसार, त्यांनी विकसित केलेल्या त्रुटी सुधारणा (एरर करेक्शन) तंत्रामुळे ‘स्टार्लिंग’ हा संगणक आजच्या सर्वात प्रगत क्वांटम संगणकांपेक्षा 20,000 पट अधिक शक्तिशाली असेल. या संगणकाच्या संगणकीय स्थितीचे (कॉम्प्युटेशनल स्टेट) अनुकरण करण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर्सच्या ‘क्विंडेसीलियन’ पट मेमरीची आवश्यकता भासेल, असा दावा ‘आयबीएम’ने केला आहे. क्वांटम संगणकांमध्ये ‘क्यूबिटस्’ या मूलभूत घटकांमध्ये त्रुटी येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संगणक तयार करताना त्रुटी नियंत्रण हे सर्वात मोठे आव्हान ठरते.
‘आयबीएम’ने विकसित केलेल्या quantum low- density parity check ( qLDPC) कोडमुळे आता हे त्रुटी नियंत्रण अधिक कार्यक्षम आणि स्केलेबल झाले आहे. या तंत्रामुळे कमी क्यूबिटस् वापरूनही मोठ्या प्रमाणावर त्रुटीरहित संगणक तयार करता येणार आहेत. ‘स्टार्लिंग’ या संगणकात 200 लॉजिकल ‘क्यूबिटस्’ (सुमारे 10,000 फिजिकल ‘क्यूबिटस्’) वापरण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात, 2033 मध्ये, IBM "Blue Jay' नावाचा आणखी प्रगत संगणक सादर करणार असून, त्यात 2,000 लॉजिकल ‘क्यूबिटस्’ असतील आणि तो 1 अब्ज क्वांटम ऑपरेशन्स पार पाडू शकेल.
‘आयबीएम’चे क्वांटम ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष जे गॅम्बेटा यांनी सांगितले की, ‘आता विज्ञानाचा अडथळा दूर झाला आहे. पुढे फक्त अभियांत्रिकी आव्हान उरले आहे.’ म्हणजेच, क्वांटम संगणक मोठ्या प्रमाणावर तयार करणे हे आता केवळ तांत्रिक आणि अभियांत्रिकी पातळीवरचे आव्हान राहिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘आयबीएम’च्या या ऐतिहासिक प्रगतीमुळे औषधनिर्मिती, सेमीकंडक्टर डिझाइन, लॉजिस्टिक्स, आर्थिक जोखीम विश्लेषण अशा अनेक क्षेत्रांत क्रांती घडू शकते. जगभरात क्वांटम संगणनातील गुंतवणूक झपाट्याने वाढत असताना, ‘आयबीएम’ने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे आणि संगणकाच्या नव्या युगाची दारे उघडली आहेत.