Sling stones : स्पेनमध्ये सापडले इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील गोफणीचे दगड

रोमन राजवटीविरुद्धच्या स्थानिक बंडाचा पुरावा!
Sling stones
स्पेनमध्ये सापडले इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील गोफणीचे दगड
Published on
Updated on

माद्रिद : ईशान्य स्पेनमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना शिशाचे दुर्मीळ ‘गोफणीचे गोळे’ सापडले असून, इसवी सन पूर्व पहिल्या शतकात रोमन राजवटीविरुद्ध झालेल्या एका स्थानिक बंडाचा हा मोठा पुरावा असल्याचे मानले जात आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, हे शिशाचे गोळे रोमन सैनिकांनी वापरले होते. स्थानिक ‘सेरेतानी’ जमातीच्या लोकांनी रोमन सैन्यावर अचानक हल्ला केला होता, त्यानंतर सैन्याने बचावात्मक कारवाई करत हे गोळे गोफणीद्वारे डागले असावेत. सेरेतानी लोकांनी आयबेरिया प्रांतात रोमन साम्राज्याच्या विस्ताराला तब्बल २०० वर्षे तीव्र विरोध केला होता.

ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘‘आयबेरिया द्वीपकल्प जिंकण्याची रोमन मोहीम ही अल्पकालीन किंवा शांततापूर्ण मुळीच नव्हती,’’ हे या संशोधनावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते. प्राचीन रोमन इतिहासकार ‘कॅशियस लिओ’ यांच्या नोंदीनुसार, सेरेतानी लोकांचे हे बंड इ.स. पूर्व ३९ मध्ये झाले होते. मात्र, हे बंड अधिक पश्चिमेकडे झाले असावे, असा आजवरचा समज होता. नुकत्याच झालेल्या उत्खननामुळे या ऐतिहासिक घटनेचे नेमके ठिकाण समोर आले आहे. सध्याच्या स्पेन-फ्रान्स सीमेवरील पूर्व पायरेनीस पर्वतरांगेतील ‘सेर्डान्या’ भागात एक प्राचीन रोमन लष्करी छावणी आढळली आहे. ही जागा त्या काळात सेरेतानी जमातीच्या क्षेत्रात येत होती.

गेल्या वर्षी ‘कॉलेट दे जोव्हेल’ या पर्वतीय खिंडीतील लष्करी छावणीच्या अवशेषांमध्ये संशोधकांना शिशाचे हे गोळे सापडले. दगड शोधण्यापेक्षा शिसे वितळवून असे गोळे बनवणे सोपे असल्याने रोमन सैन्य याचा वापर करत असे. सापडलेल्या दोन गोळ्यांवर ‘CND’ ही अक्षरे कोरलेली आहेत. ही अक्षरे त्या काळातील हिस्पानिया प्रांताचे रोमन गव्हर्नर ‘ग्नेस डोमिटियस कॅल्व्हिनस’ यांच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे. ते इ.स. पूर्व ३९ मध्ये या पदावर होते, ज्यामुळे या घटनेचा अचूक काळ निश्चित करण्यात मदत झाली आहे.

याशिवाय, रोमन सैनिकांच्या चपलांचे वैशिष्ट्यपूर्ण लोखंडी खिळे, कपड्यांना लावायचे रोमन ब्रूच आणि त्या काळातील काही रोमन नाणीदेखील या ठिकाणी सापडली आहेत. कॅफेजसोबत झालेल्या ‘दुसऱ्या प्युनिक युद्धा’दरम्यान इ.स. पूर्व २१८ मध्ये रोमन सैन्याने भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर पहिले पाऊल ठेवले आणि आयबेरियावर (ज्याला रोमन लोक ‘हिस्पानिया’ म्हणत) ताबा मिळवण्यास सुरुवात केली. परंतु, सेरेतानी आणि तेथील इतर स्थानिक मूळ निवासी जमातींनी या विस्ताराला कडवा प्रतिकार केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news