

पोर्नैनन (फिनलंड) : फिनलंडमधील अभियंते लवकरच एका नवीन प्रकारच्या ‘सँड बॅटरी’ची (वाळूची बॅटरी) चाचणी सुरू करणार आहेत. ही बॅटरी उष्णतेच्या स्वरूपात साठवलेल्या ऊर्जेचे पुन्हा विजेमध्ये रूपांतर करून ती ग््राीडला पुरवण्याचे काम करेल. ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात हा एक मोठा मैलाचा दगड मानला जात असला, तरी यातील गुंतवणुकीचा खर्च ग््रााहकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पोलर नाईट एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉमी एरोनेन यांनी सांगितले की, ही नवीन बॅटरी जुन्या आवृत्तीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जुनी बॅटरी उभ्या पिंपाच्या आकाराची होती, तर नवीन बॅटरीची रचना आडवी असेल. या बॅटरीची अपेक्षित कार्यक्षमता 30 टक्के ते 35 टक्के आहे, जी पारंपरिक ज्वलन-आधारित ऊर्जा प्रकल्पांच्या बरोबरीची आहे. जर उष्णता आणि वीज या दोन्हींचा विचार केला, तर या प्रणालीची एकूण कार्यक्षमता 90 टक्क्यांपर्यंत असू शकते. ही बॅटरी ग््राीडचा समतोल राखण्यास, कार्बन उत्सर्जन कमी करण्यास आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. ज्या उद्योगांना उष्णता आणि वीज या दोन्हींची गरज असते, अशा उद्योगांसाठी ही सँड बॅटरी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः मोठ्या युटिलिटी कंपन्यांसाठी हे एक स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा साठवणुकीचे साधन ठरू शकते.
कशी कार्य करते ही बॅटरी?
‘पोलर नाईट एनर्जी’ या कंपनीने यापूर्वीच सँड बॅटरीचे मॉडेल विकसित केले आहे. यामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर करून वाळू किंवा वाळूसदृश पदार्थांना 400 अंश सेल्सिअसपर्यंत तापवले जाते. ही उष्णता सध्या गरम पाणी, वाफ किंवा गरम हवा मिळवण्यासाठी वापरली जाते. आता विकसित केली जाणारी नवीन बॅटरी ‘पॉवर-टू-हीट-टू-पॉवर’ या तत्त्वावर काम करेल. म्हणजेच विजेपासून उष्णता आणि पुन्हा त्या उष्णतेपासून वीज तयार केली जाईल. ही बॅटरी अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी ती अतिशय उच्च तापमानावर चालवली जाणार आहे.