

बीजिंग : डोळ्यात काहीतरी गेल्यावर किंवा खुपल्यावर अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. आपण लगेच डोळा चोळतो किंवा पाण्याने धुतो; पण चीनच्या बीजिंगमध्ये राहणार्या एका 41 वर्षीय महिलेसोबत जो प्रकार घडला, तो ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. डोळ्यात काहीतरी अडकल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात गेलेल्या या महिलेच्या डोळ्यातून डॉक्टरांनी एक-दोन नव्हे, तर चक्क चार जिवंत कृमी बाहेर काढल्या.
ही महिला उजव्या डोळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटत असल्यामुळे रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तिच्या डोळ्याची तपासणी केली असता, डोळ्याच्या बाहेरील पारदर्शक पडद्याला (कॉर्निया) इजा झाल्याचे दिसले. मात्र, त्यांना डोळ्यात कोणताही बाह्य पदार्थ किंवा कचरा आढळला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी डोळ्यातील जळजळ कमी करण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी अँटीबायोटिक आय-ड्रॉप्स दिले. डॉक्टरांनी दिलेले आय-ड्रॉप्स वापरूनही महिलेला कोणताही आराम मिळाला नाही.
महिनाभरानंतर ती पुन्हा त्याच तक्रारी घेऊन रुग्णालयात परत आली. यावेळी डोळ्यात काहीतरी अडकल्याच्या भावनेसोबतच डोळा सतत लाल होणे आणि खाज सुटणे यांसारखी लक्षणेही जाणवत होती. यावेळी डॉक्टरांनी अधिक काळजीपूर्वक तपासणी केली. त्यांनी पाहिले की, महिलेच्या वरच्या पापणीच्या आतील भागाला सूज आली होती आणि त्यावर पुरळांसारखे लहान उंचवटे आले होते. अधिक तपासणीसाठी डॉक्टरांनी ‘आयलिड रिट्रॅक्टर’ नावाच्या उपकरणाने पापणी मागे खेचून पाहिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. पापणीच्या आतमध्ये चार लहान, पांढर्या कृमी वळवळत होत्या.
ही धक्कादायक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या या कृमींची ओळख ‘थेलाझिया कॅलिपेडा’ या नावाने झाली. या कृमींना सामान्यतः ‘ओरिएंटल आय वर्म’ म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे ‘थेलाझियासिस’ नावाचा परजीवी संसर्ग होतो. सर्वप्रथम, डॉक्टरांनी महिलेचा डोळा बधीर करण्यासाठी औषध लावले. त्यानंतर एका विशेष चिमट्याच्या मदतीने सर्व चारही कृमी काळजीपूर्वक बाहेर काढल्या. डोळ्यात आणखी कृमी शिल्लक राहू नयेत, यासाठी डोळा एका विशेष द्रावणाने स्वच्छ धुतला. भविष्यात कोणताही जिवाणू संसर्ग होऊ नये म्हणून तिला दिवसातून अनेक वेळा वापरण्यासाठी अँटीबायोटिक मलम देण्यात आले. या उपचारांनंतर अवघ्या एका आठवड्यात महिलेच्या त्रासात लक्षणीय घट झाली.