Kukulkan Temple | पिरॅमिडसारख्या मंदिराच्या पायर्‍यांवरून सरपटतो ‘पंखांचा साप’

Kukulkan Temple |
Kukulkan Temple | पिरॅमिडसारख्या मंदिराच्या पायर्‍यांवरून सरपटतो ‘पंखांचा साप’
Published on
Updated on

मेक्सिको सिटी : जगात अनेक रहस्यमयी मंदिरे आहेत; परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराविषयी सांगणार आहोत, ज्याची माहिती ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. मेक्सिकोमधील ‘चिचेन इत्झा’ या प्राचीन शहरात स्थित ‘कुकुलकॅन मंदिर’ हे जगातील सर्वात जुन्या आणि आश्चर्यकारक मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर प्राचीन ‘माया संस्कृती’च्या उत्कृष्ट इंजिनिअरिंग आणि खगोलशास्त्रीय ज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. दूरून पाहिल्यास हे मंदिर एखाद्या पिरामिडसारखे दिसते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, वर्षातून काही ठराविक दिवशी याच्या पायर्‍यांवर एक अवाढव्य साप सरपटताना दिसतो! वास्तविक पाहता, हा कोणताही अंधविश्वास नसून प्राचीन विज्ञानाचा चमत्कार आहे. जेव्हा सूर्यप्रकाश एका विशिष्ट कोनातून या पिरामिडवर पडतो, तेव्हा प्रकाश आणि सावलीचा असा काही खेळ रंगतो की, मंदिराच्या पायर्‍यांवर हुबेहूब सापासारखी आकृती तयार होते.

हा नजारा पाहताना असे वाटते की, जणू एखादा विशाल साप हळूहळू पायर्‍यांवरून खाली उतरत आहे. हा देखावा इतका अद्भुत आणि अंगावर काटा आणणारा असतो की, लोक याला चमत्कारापेक्षा कमी मानत नाहीत. वर्षातून केवळ काही ठराविक दिवसांसाठीच हा नजारा पाहायला मिळत असल्याने, तो पाहण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासकारांच्या मते, हजारो वर्षांपूर्वी माया संस्कृतीच्या लोकांनी या मंदिराची निर्मिती केली होती. त्या काळातील लोक खगोलशास्त्र आणि गणितात अत्यंत पारंगत होते. त्यांनी या मंदिराची रचना अशी केली होती की, सूर्याची दिशा आणि ॠतू बदलांचा थेट प्रभाव मंदिरावर दिसावा.

स्थानिक नागरिक आणि अभ्यासकांच्या मते, ही घटना ‘वसंत’ आणि ‘शरद’ संपातीच्या वेळी सर्वात स्पष्ट दिसते. या दिवसांत दिवस आणि रात्र दोन्ही समान कालावधीचे असतात. याच काळात सूर्यकिरणे मंदिराच्या रचनेला अशा प्रकारे स्पर्श करतात की ही अद्भुत आकृती तयार होते. माया संस्कृतीमध्ये ‘कुकुलकॅन’ यांना ‘पंखांचा साप’ म्हणजेच सर्पदेवता मानले जाते. त्यांच्या श्रद्धेनुसार, हे देवता पृथ्वी आणि आकाश यांना जोडण्याचे काम करतात. जेव्हा पायर्‍यांवरून साप खाली उतरतानाचा भास होतो, तेव्हा देव कुकुलकॅन स्वतः पृथ्वीवर अवतरत असल्याचा संकेत आहे, असे मानले जाते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही, हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही उपकरणांशिवाय इतकी अचूक वास्तुकला कशी उभारली गेली असेल, याचे रहस्य वैज्ञानिक आणि इतिहासकारांना अजूनही उलगडलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news