

पॅरिस : टार्डिग्रेड (ज्यांना ‘वॉटर बेअर्स’ म्हणूनही ओळखले जाते) या अतिसूक्ष्म आणि अत्यंत खडतर स्थितीतही तग धरून राहू शकणाऱ्या जीवांच्या जगात डोकावण्याची संधी सहसा मिळत नाही. मात्र, जीवशास्त्रज्ञ गोन्झालो क्विरोगा-आर्टिगास यांनी आपल्या छायाचित्रणातून या जीवांचे गुप्त जीवन अत्यंत तपशीलवार आणि थक्क करणाऱ्या स्वरूपात जगासमोर आणले आहे. निकॉनच्या २०२६ च्या फोटोमायक्रोग्राफी स्पर्धेत १२ वे स्थान मिळवलेल्या एका छायाचित्रात ‘हायप्सिबियस एक्सेम्प्लारिस’ (Hypsibius exemplaris) या प्रजातीचा एक टार्डिग्रेड आपल्या शरीराचे कठीण बाह्य आवरण अर्थात कात (क्युटिकल किंवा एक्सुव्हियम) टाकताना आणि त्याच टाकलेल्या कातडीत अंडे घालताना दिसत आहे.
फ्रान्समधील माँटपेलियर सेल बायोलॉजी रिसर्च सेंटरचे पोस्टडॉक्टरल संशोधक क्विरोगा-आर्टिगास यांनी सांगितले की, ‘‘माझ्या संशोधनाचा मोठा भाग इमेजिंगशी संबंधित आहे आणि कॉन्फोकल मायक्रोस्कोपसमोर घालवलेल्या अनेक तासांत मला काही अत्यंत सुंदर आणि अनपेक्षित दृश्ये पाहायला मिळाली आहेत. टार्डिग्रेडच्या प्रजननाचे एक वैशिष्ट्य म्हणजे काही प्रजाती आपली अंडी टाकलेल्या क्युटिकल किंवा एक्सुव्हियममध्ये घालतात. त्यामुळे विकसित होणाऱ्या गर्भाला या कातडीमुळे अतिरिक्त शारीरिक संरक्षण मिळू शकते.’’ ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या माहितीनुसार, काही प्रजातींमध्ये नर टार्डिग्रेड अंडी घालण्यापूर्वी कात टाकणाऱ्या मादीच्या क्युटिकलमध्ये शुक्राणू सोडतात, तर इतर प्रजातींमध्ये अंडी क्युटिकलमध्ये सोडल्यानंतर नर त्यांचे फलन करतात. मात्र, काही प्रजातींना प्रजननासाठी नराची गरजच भासत नाही. क्विरोगा-आर्टिगास म्हणाले की, ‘‘अनेक प्रजातींमध्ये पार्थेनोजेनेसिस (अनिषेकजनन) द्वारे प्रजनन होते. यात फलनाशिवायच अंड्यापासून गर्भ विकसित होतो. याचा अर्थ प्रजननासाठी नरांची आवश्यकता नसते आणि तयार होणारी पिल्ले जनुकीयदृष्ट्या आपल्या आईशी खूप मिळतीजुळती असतात.’’ छायाचित्रातील प्रजाती याच गटात मोडते. कात टाकणे आणि अंडी घालण्याची प्रक्रिया अनेक तास चालत असली, तरी कात सुटण्याची प्रत्यक्ष कृती तुलनेने जलद घडते. त्यामुळे ती कॅमेऱ्यात टिपणे सोपे काम नाही.