India Snake Park | भारतातील प्रसिद्ध स्नेक पार्क

India snake park |
India snake park | भारतातील प्रसिद्ध स्नेक पार्क
Published on
Updated on

भारतात फिरण्यासाठी फक्त डोंगर, तलाव आणि जंगलेच नाहीत, तर काही अशी ठिकाणे देखील आहेत, जी रोमांच आवडणार्‍या लोकांना एक वेगळाच अनुभव देतात. गेल्या काही वर्षांत देशातील ‘स्नेक पार्क’ (सापांची उद्याने) पर्यटकांमध्ये वेगाने लोकप्रिय झाली आहेत. येथे लोक जगातील सर्वात विषारी आणि दुर्मीळ साप अतिशय जवळून पाहू शकतात. किंग कोब्रापासून ते रसेल वाइपर (घोणस) आणि इंडियन पायथन (अजगर) पर्यंत अशा अनेक प्रजाती येथे पाहायला मिळतात, ज्यांना पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. भारतातील पाच प्रसिद्ध स्नेक पार्कची ही माहिती...

कात्रज स्नेक पार्क, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पुणे येथे असलेले कात्रज स्नेक पार्क देशातील सर्वात प्रसिद्ध स्नेक पार्कपैकी एक मानले जाते. हे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचा एक भाग असून, दरवर्षी येथे हजारो पर्यटक भेट देतात. या पार्कमध्ये इंडियन रॉक पायथन, किंग कोब्रा, रसेल वाइपर आणि सापांच्या अनेक विषारी प्रजाती पाहायला मिळतात. येथे येणार्‍या लोकांना सापांची जीवनशैली आणि त्यांच्या वर्तनाबद्दल माहिती दिली जाते. पुणे विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरून येथे सहज पोहोचता येते.

चेन्नई स्नेक पार्क, तामिळनाडू

तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये असलेले हे स्नेक पार्क भारतातील पहिले स्नेक पार्क मानले जाते. याची सुरुवात 1972 मध्ये प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ रोमुलस व्हिटेकर यांनी केली होती. हे पार्क ‘गिंडी नॅशनल पार्क’च्या आत असून, येथे विविध प्रकारच्या विषारी सापांना सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे. येथे नाग, मण्यार, घोणस आणि अजगर यांसारख्या अनेक धोकादायक प्रजाती पाहायला मिळतात. याशिवाय येथे मगरी आणि कासवही ठेवण्यात आले आहेत. हे ठिकाण केवळ पर्यटनासाठीच नाही, तर संशोधन आणि शिक्षणासाठीही अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

परासिनीकडवू स्नेक पार्क, केरळ

केरलच्या कन्नूर जिल्ह्यात असलेले परासिनीकडवू स्नेक पार्क आपली एक वेगळी ओळख राखून आहे. हे पार्क फक्त साप दाखवण्यासाठी नाही, तर सापांचे रेस्क्यू (बचाव) आणि संशोधन केंद्र म्हणूनही काम करते. येथे जगातील सर्वात विषारी सापांमध्ये गणना होणार्‍या ‘किंग कोब—ा’ला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळते. घनदाट झाडी आणि हिरवळीच्या भागात बनवलेले हे पार्क निसर्गप्रेमींना खूप आवडते. येथे अनेकदा जखमी सापांवर उपचार केले जातात आणि त्यांना पुन्हा जंगलात सोडले जाते.

कलकत्ता स्नेक पार्क, पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील कलकत्ता स्नेक पार्क हे देखील देशातील जुन्या आणि प्रसिद्ध स्नेक पार्कपैकी एक आहे. याची सुरुवात 1977 मध्ये झाली होती. हे पार्क लोकांना सापांचे संरक्षण आणि सर्पदंशापासून कसा बचाव करावा याबद्दल जागरूक करण्याचे काम करते. येथे सापांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. पार्कमध्ये येणार्‍या लोकांना प्रामुख्याने हे पटवून दिले जाते की, साप माणसांचे शत्रू नसतात आणि बहुतेक प्रकरणांमध्ये ते स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच हे पार्क लहान मुले आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक मानले जाते.

बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्क, कर्नाटक

बंगळूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्क त्याच्या सफारी आणि वन्यजीवांच्या अनुभवासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे सापांसाठी आणि सरपटणार्‍या प्राण्यांसाठी एक खास विभाग तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी लोक सापांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात पाहू शकतात. येथे इंडियन पायथन, कोब—ा आणि अनेक विषारी प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण जंगलासारखे वातावरण असल्यामुळे येथे फिरण्याचा आनंद आणि रोमांच आणखी वाढतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news