

नवी दिल्ली : जगात अशा अनेक जागा आहेत, ज्या आपल्या अजब वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात. आफ्रिका खंडातील नामिबिया देशातील नामिब वाळवंट हे अशाच एका निसर्गाच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वात जुने वाळवंट असून, गेल्या 5.5 ते 8 कोटी वर्षांपासून ते कोरडे आहे.
या वाळवंटातील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील तफावत. दिवसा येथे इतकी भीषण उष्णता असते की, वाळूचे तापमान 60 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. कडक उन्हामुळे लोक घामाने पूर्णपणे भिजून जातात. रात्रीच्या वेळी अर्थात सूर्य मावळताच येथील चित्र पूर्णपणे बदलते. तापमान झपाट्याने खाली घसरते आणि शून्याच्या खाली पोहोचते. दिवसा घामामुळे हैराण होणार्या लोकांना रात्री थंडीपासून वाचण्यासाठी जाड ब्लँकेट किंवा रजाईचा आधार घ्यावा लागतो. काही भागात रात्री बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता असते.
नामिब वाळवंटाचे दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे अटलांटिक महासागराशी होणारे मिलन. येथे एका बाजूला अथांग महासागर आहे, तर दुसर्या बाजूला वाळूच्या उंच टेकड्या. याला ‘नर्काचे द्वार’ असेही म्हटले जाते. समुद्राच्या थंड प्रवाहामुळे किनारीभागात दिवसाचे तापमान 9 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. मात्र, वाळवंटाच्या अंतर्गत भागात उष्णता 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. जगातील सर्वात कोरडा प्रदेश डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि इतर अहवालांनुसार, या वाळवंटातील काही भागात वर्षाला केवळ 2 मिलीमीटर पाऊस पडतो. यामुळेच हे जगातील सर्वात शुष्क अर्थात कोरडे (ड्राय) ठिकाणांपैकी एक मानले जाते. येथील दाट धुक्यामुळे तयार होणारा ओलावाच येथील वनस्पती आणि प्राण्यांच्या जगण्याचा मुख्य स्रोत आहे.