

टोकियो : जपानमधील संशोधकांनी सुमारे 11.5 कोटी वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन त्सुनामीचा पुरावा शोधून काढला आहे आणि तो कुठे सापडला आहे माहिती आहे का? झाडांच्या अंबरमध्ये, म्हणजेच झाडांच्या रेझिनपासून तयार झालेल्या जीवाश्मभूत राळेत हा अनोखा शोध 15 मे रोजी ‘सायंटिफिक रिपोर्टस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संशोधकांनी जपानच्या उत्तरेकडील होक्कायडो प्रांतातील शिमोनाकागावा खाणीतून मिळवलेल्या अंबरयुक्त सिलिका थरांचे विश्लेषण केले. हे थर प्रारंभीच्या क्रिटेशियस युगात (116 ते 114 दशलक्ष वर्षांपूर्वी) खोल समुद्रात साचले होते, जेव्हा या भागाचे रूप खडकाळ सागरतळ होते. अंबर म्हणजेच झाडांची रेझिन किंवा डिंक, जी सुमारे लाखो वर्षांत जीवाश्मभूत होते, ती जर जमिनीवरच सुकली असती, तर तिच्या रचनेत विशिष्ट बदल दिसले असते; परंतु या अंबरच्या नमुन्यांमध्ये संशोधकांना ‘फ्लेम स्ट्रक्चर्स’ नावाच्या विशेष रचनात्मक विकृती दिसून आल्या, ज्या अचानक आणि जलद साचलेल्या मऊ गाळात तयार होतात आणि त्या उलट्या ज्वाळांसारख्या रचनांतून प्रकट होतात.
संशोधकांच्या मते, हे अंबर त्सुनामीने झाडे आणि वनस्पतींचा कचरा समुद्रात ओढून नेत असतानाच वाहून गेलं. त्यामुळे ते हवेच्या संपर्कात न येता थेट सागरतळात पोहोचले आणि सिल्टच्या थराखाली गाडले गेले, ज्यामुळे ते लाखो वर्षांपर्यंत जतन राहिले. आजपर्यंत वैज्ञानिक त्सुनामींचा पुरावा मोठे जीवाश्मी खडक, अचानक गाळातील बदल अशा गोष्टींमधून शोधायचे; पण वादळांमुळेही असेच परिणाम होतात. त्यामुळे दोघांत फरक करणे कठीण होते. मात्र, या अभ्यासातील अंबरातील विशिष्ट विकृती आणि समुद्रातील थेट साचलेपण हे दर्शवतात की, हे वादळ नव्हे, तर एक किंवा अधिक त्सुनामींचे परिणाम असू शकतात.