

वॉशिंग्टन : वय वाढणे किंवा वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी ती सर्वांसाठी एकाच पद्धतीने घडत नाही. रेणूच्या (मोलिक्युलर) पातळीवर प्रत्येकाची वृद्धत्वाची प्रक्रिया वेगळी असते आणि ती व्यक्तीची जीवनशैली, अनुवंशिकता आणि सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, पेशी आणि रेणूंच्या पातळीवर वयोमानानुसार होणारे बदल हे ‘व्यक्तिसापेक्ष आणि संदर्भ-सापेक्ष’ असतात.
संशोधकांनी मानवी शरीरातील हजारो रेणू, प्रथिने आणि पेशींच्या कार्याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले की, दोन समान वयाच्या व्यक्तींमध्येही वृद्धत्वाची रेण्वीय गती आणि त्याची लक्षणे भिन्न असू शकतात. एकाच वयाच्या एका व्यक्तीमध्ये यकृतातील किंवा हृदयातील रेणू वेगाने वृद्ध होत असतील, तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती किंवा मूत्रपिंडाशी संबंधित रेणूंमध्ये आधी बदल दिसून येतात. या संशोधनानुसार, माणसाचे शरीर कशा प्रकारे वृद्ध होत आहे हे केवळ त्याच्या कॅलेंडरवरील वयावर अवलंबून नसून, त्याच्या शरीरातील डीएनए, चयापचय, खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणाव आणि पर्यावरणाचा प्रभाव यावर ठरते.
या शोधाचा मोठा फायदा भविष्यातील वैद्यकीय उपचारांमध्ये होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील विशिष्ट ‘मोलिक्युलर एजिंग पॅटर्न’ (रेण्वीय वृद्धत्व नमुना) ओळखून, त्यानुसार वैयक्तिक उपचार आणि औषधे (Personalized Medicine) देणे शक्य होईल. यामुळे वयोमानानुसार होणारे आजार, जसे की हृदयविकार, मधुमेह आणि अल्झायमर यांना वेळीच रोखण्यासाठी किंवा त्यांची गती मंदावण्यासाठी मदत होईल.