

लंडन : एक वाघ आपल्या बछड्यांजवळ जातो आणि डोके हलवून अत्यंत आपुलकीने त्यांना अभिवादन करतो, तर दुसरीकडे वाघीण जवळच विश्रांती घेत असते... पीबीएस नेचरच्या ‘‘टायगर आयलंड’’ या दोन भागांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये कैद झालेला हा आश्चर्यकारक प्रसंग नेपाळमधील दोन वाघांच्या कुटुंबांचा प्रवास दाखवतो.
एका वाघाचे संपूर्ण ‘‘कुटुंब’’ एकत्र वेळ घालवताना कॅमेऱ्यात कैद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वन्यजीव शास्त्रज्ञ आणि चित्रपट निर्माते डॅन ओ'नील, ज्यांनी या डॉक्युमेंट्रीसाठी काम केले आहे, त्यांच्या मते एकाकी राहणारे हे प्राणी आपल्या पिल्लांशी कसे वागतात, याबद्दलच्या आजवरच्या आपल्या सर्व पारंपरिक समजांना हे दृश्य आव्हान देते. यापूर्वी असा समज होता की, वाघिणी आपल्या पिल्लांचे संगोपन नर वाघाच्या कोणत्याही मदतीशिवाय सुमारे दोन वर्षे एकट्याच करतात. परंतु, नेहमीच असे घडते असे नाही. ओ'नील यांनी सांगितले, ‘‘हे दृश्य हेच दाखवते की आपल्याला या प्राण्यांबद्दल खरोखर काहीच माहिती नाही. आपण विचार करतो त्यापेक्षा हे प्राणी खूप अधिक क्लिष्ट आणि प्रगत वर्तनाचे आहेत.’’
वाघांच्या एकाकी स्वभावाबद्दलच्या आपल्या समजांना मोडीत काढणारा हा ‘टायगर आयलंड’मधील एकमेव प्रसंग नाही. दुसऱ्या एका दृश्यात, एक वाघीण दुसऱ्या वाघिणीच्या पिल्लांची काळजी घेताना दिसते. ‘‘या प्राण्यांच्या जगण्याबद्दल आपल्या डोक्यात अतिशय ताठर संकल्पना आहेत,’’ असे ओ'नील म्हणाले. परंतु, निसर्ग हा ‘‘विविधतेने नटलेला आणि सतत बदलणारा’’ आहे आणि वाघ त्याला अपवाद नाहीत. दुसऱ्या वाघिणीच्या पिल्लांची काळजी घेणाऱ्या मादीचे दृश्य, वाघिणी आपल्या पिल्लांचे संरक्षण कसे करतात याबद्दल महत्त्वाचे संकेत देऊ शकते. सिंह आणि वाघ अनेकदा दुसऱ्या प्राण्याच्या पिल्लांना मारून टाकतात (याला ‘इन्फँटिसाइड’ किंवा ‘बालहत्या’ म्हणतात), विशेषतः जेव्हा एखादा नवीन नर वाघ त्या क्षेत्रावर ताबा मिळवतो.
अशा वेळी दुसऱ्या मादीला पिल्लांची काळजी घेऊ दिल्यास अधिक पिल्ले मोठी होईपर्यंत वाचू शकतील, असा अंदाज ओ'नील यांनी व्यक्त केला. यापूर्वीही वाघिणींनी एकमेकांच्या पिल्लांचे एकत्र संगोपन केल्याची काही दुर्मीळ उदाहरणे समोर आली आहेत. हे दुर्मीळ प्रसंग कॅमेऱ्यात टिपण्यासाठी टीमने शक्तिशाली ऑप्टिकल-झूम लेन्स आणि अतिशय शांत आवाज असलेल्या ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला. यामुळे वाघांना कोणताही त्रास न देता अशा दुर्गम ठिकाणी त्यांचे निरीक्षण करणे शक्य झाले. पारंपरिक ‘कॅमेरा ट्रॅप्स’ फक्त वाटेवरून जाणाऱ्या प्राण्यांना टिपतात, ज्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी अदृश्यच राहतात. ओ'नील यांनी स्पष्ट केले की, या ड्रोनचा आवाज शूटिंगच्या ठिकाणच्या स्थानिक मधमाश्यांपेक्षाही कमी होता, ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक दैनंदिन आयुष्याचे खरे दृश्य टिपता आले.