

बँडनबर्ग : जर्मनीतील बँडनबर्ग प्रदेशात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका प्राचीन हँडगनचे (हातात धरता येणारे बंदुकीसारखे शस्त्र) अवशेष सापडले आहेत. नवीन संशोधनानुसार, हे युरोपातील सर्वात जुने पोर्टेबल गनपावडर शस्त्र असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे शस्त्र साधारणपणे 1390 सालातील असावे, असा अंदाज आहे. जर हा दावा सिद्ध झाला, तर हे शस्त्र प्रसिद्ध ‘टेननबर्ग रायफल’ (Tannenberg rifle - 1399) पेक्षाही नऊ वर्षांनी जुने ठरेल. आतापर्यंत ‘टेननबर्ग रायफल’ला युरोपातील सर्वात जुने हँडहेल्ड अग्न्यास्त्र मानले जात होते. सापडलेला अवशेष केवळ 2 इंच (6 सेंटीमीटर) लांब आहे. बँडनबर्ग स्टेट ऑफिस फॉर हेरिटेज मॅनेजमेंटचे प्रमुख क्रिस्टोफ क्रॉस्कोफ यांनी सांगितले की, ‘या कालखंडात बँडनबर्गमध्ये अग्न्यास्त्रांचा वापर झाल्याचा कोणताही लेखी किंवा पुरातत्त्व पुरावा आतापर्यंत उपलब्ध नव्हता; आम्ही केवळ त्याचा अंदाज लावत होतो.’
2023 मध्ये मॅथियास डॅसे या स्वयंसेवक वारसा संवर्धनकर्त्याला ‘क्लेट्झके किल्ल्या’जवळ सर्वेक्षण करताना हे अवशेष सापडले. तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर हे कांस्य धातूपासून बनवलेल्या प्राचीन बंदुकीचे बॅरल असल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांनी या अवशेषाला ‘Kletzker Handrohr" (क्लेट्झके हँड कॅनन) असे नाव दिले आहे. इतिहासकारांच्या मते, हे शस्त्र 1390 मधील क्लेट्झके किल्ल्याच्या वेढ्याशी संबंधित असू शकते. फ्रान्सिस्कन साधू डेटमार ऑफ ल्युबेक यांच्या नोंदीनुसार, 1390 मध्ये दोन सरदारांनी 1,100 सैनिकांसह या किल्ल्यावर हल्ला केला होता. शक्तिशाली ‘वॉन क्विट्झो’ कुटुंबाने हा किल्ला लढवला आणि आक्रमणकर्त्यांना पळवून लावले होते. हा शोध युरोपातील शस्त्रास्त्रांच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा ठरणार आहे.