

रोम : नवीन संशोधनानुसार, बहुतेक पुरातन युरोपियन लोकांना लोहयुगाच्या (सुमारे 3,000 वर्षांपूर्वी) अगदी शेवटपर्यंत गडद किंवा सावळी त्वचा, काळे केस आणि काळे डोळे होते. संशोधकांनी असे आढळून आले की, युरोपियन लोकांमध्ये फिकट किंवा गौरवर्णीय त्वचा, सोनेरी केस आणि निळे डोळे निर्माण करणारी जनुके साधारणतः 14,000 वर्षांपूर्वी, म्हणजेच पॅलिओलिथिक कालखंडाच्या (जुन्या दगडी युगाच्या) उत्तर टप्प्यात विकसित झाली. परंतु ही वैशिष्ट्ये बराच काळ अपवादात्मक स्वरूपातच दिसून येत होती, असे या अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक सिल्व्हिया घिरोत्तो, इटलीच्या फेरारा विद्यापीठातील आनुवंशिकशास्त्रज्ञ, यांनी सांगितले.
युरोपमधील तुलनेने कमी सूर्यप्रकाशात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन डी संश्लेषित करण्यासाठी फिकट त्वचा उपयुक्त ठरली असावी. कारण हा जीवनसत्त्व हाडे, दात आणि स्नायूंसाठी आवश्यक आहे. मात्र, फिकट डोळ्यांच्या रंगाला (जसे की निळे किंवा हिरवे) विशेषतः कोणतेही उत्क्रांतीवादी फायदे नव्हते. त्यामुळे त्याचा विकास निव्वळ संयोगाने किंवा लैंगिक निवडीमुळे झालेला असावा, असे घिरोत्तो यांनी सांगितले. संशोधकांनी युरोप आणि आशियातील 34 देशांतील पुरातत्त्व स्थळांमधून मिळालेल्या 348 पुरातन डीएनए नमुन्यांचे विश्लेषण केले. हा अभ्यास 12 फेब—ुवारी रोजी bioRxiv या प्रीप्रिंट सर्व्हरवर प्रकाशित करण्यात आला असून, तो अद्याप समीक्षण प्रक्रियेत आहे. या अभ्यासातील सर्वात प्राचीन नमुना 45,000 वर्षांपूर्वीचा आहे, जो 2008 मध्ये पश्चिम सैबेरियातील इर्टीश नदीच्या परिसरात सापडलेल्या Ust'- Ishim व्यक्तीचा होता. तर स्वीडनमधील सुमारे 9,000 वर्षे जुना SF12 व्यक्तीचा डीएनएही संशोधनासाठी वापरण्यात आला.
अनेक जुने डीएनए नमुने खराब झालेले असल्यामुळे, संशोधकांनी ‘प्रॉबॅबिलिस्टिक फेनोटाइप इनफरन्स‘ आणि HIrisPlex- S प्रणालीचा वापर करून त्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग, केस आणि डोळ्यांची वैशिष्ट्य अंदाजाने निश्चित केली. पुराणतत्त्वज्ञांच्या मते, होमोसेपियन्स साधारणतः 50,000 ते 60,000 वर्षांपूर्वी युरोपात स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्यात अजूनही आफ्रिकेतील पूर्वजांचे आनुवंशिक वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती, ज्यामुळे त्यांना गडद त्वचा, केस आणि डोळे होते. 14,000 वर्षांपूर्वी युरोपात फिकट रंगाच्या वैशिष्ट्यांची निर्मिती झाली असली, तरी ती बरीच वर्षे क्वचितच दिसून येत होती. मात्र, सुमारे 3,000 वर्षांपूर्वीच्या कालखंडात ती मोठ्या प्रमाणावर वाढली आणि युरोपभर पसरली.