

लंडन : दक्षिण युरोपमधील राणी मुंग्या एका वेगळ्याच प्रजातीच्या नर मुंग्यांना जन्म देतात. यामुळे प्राणीशास्त्र आणि प्रजनन विज्ञानाचे नियम बदलून गेले आहेत. तसेच प्रजातींच्या मर्यादांबद्दलच्या आपल्या समजावर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘इबेरिअन हार्वेस्टर अॅन्ट’ (Iberian harvester ant, Messor ibericus) या मुंग्यांच्या वसाहतींमधील सर्व कामकरी मुंग्या संकरित (hybrid) असतात. वसाहतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी राणीला ‘मेसोर स्ट्रक्टर’ (Messor structor) नावाच्या एका दूरच्या संबंधित प्रजातीच्या नरांशी मिलन करावे लागते. पण संशोधकांना असे आढळले की, काही इबेरिअन हार्वेस्टर अॅन्ट वसाहतींजवळ ‘एम. स्ट्रक्टर’च्या वसाहती नाहीत.
हे खूप, खूप असामान्य होते. खरं तर हा एक प्रकारचा विरोधाभास होता, असे मॉन्टपेलियर विद्यापीठातील उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक जोनाथन रोमिगुइअर यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांच्या टीमला वाटले की, नमुन्यांमध्ये काहीतरी चूक आहे. पण नंतर त्यांना अशा 69 जागा सापडल्या जिथे हीच परिस्थिती होती. आम्हाला सत्य स्वीकारून ‘मेसोर इबेरिकस’ वसाहतींमध्ये काहीतरी खास आहे का, हे तपासणे भाग पडले, असे रोमिगुइअर म्हणाले. हा विरोधाभास सोडवण्याच्या प्रयत्नात, रोमिगुइअर आणि त्यांच्या टीमला आढळले की, इबेरिअन हार्वेस्टर अॅन्टच्या राण्या अशा अंडी घालतात ज्यातून ‘एम. स्ट्रक्टर’ प्रजातीचे नर जन्माला येतात आणि हेच नर पुढे कामकरी मुंग्यांचे जनक बनतात.
3 सप्टेंबर रोजी ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा शोध, कोणत्याही प्राण्याने आपल्या सामान्य जीवनचक्रात दुसर्या प्रजातीच्या पिल्लांना जन्म दिल्याचे पहिले उदाहरण आहे. सुरुवातीला आमच्या टीमला याबद्दल गंमत वाटायची, असे रोमिगुइअर म्हणाले. पण जसजसे आम्हाला अधिक निष्कर्ष मिळत गेले, तसतसे ती एक कल्पना न राहता एक सिद्धांत बनली. मुंग्या हे ‘यूसोशियल’ (eusocial)) कीटक आहेत.
याचा अर्थ त्यांच्या वसाहतींमध्ये मुख्यतः वंध्य (infertile) मादी मुंग्या (कामकरी) आणि काही प्रजननक्षम मादी मुंग्या (राण्या) असतात. नर मुंग्या फक्त राण्यांना मिलन काळात फलित करण्यासाठी अस्तित्वात असतात आणि त्यानंतर लवकरच मरतात. राण्या त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच मिलन करतात आणि नरांचे शुक्राणू एका विशेष अवयवात साठवून ठेवतात. नंतर त्या या शुक्राणूंचा वापर करून तीन प्रकारची अंडी घालतात : नवीन राण्या, कामकरी मुंग्या किंवा नर मुंग्या.
मात्र इबेरिअन हार्वेस्टर अॅन्ट त्यांच्याच प्रजातीच्या नरांशी मिलन केल्यास फक्त नवीन राण्या तयार करू शकतात. याचे कारण ‘स्वार्थी राणी जनुके’ (selfish queen genes) असल्याचे मानले जाते. ‘एम. इबेरिकस’ च्या नरांचे डीएनए असे काम करतात की, ते वंध्य कामकरी मुंग्यांच्या ऐवजी प्रजननक्षम राण्या तयार करतात, ज्यामुळे त्यांचे जनुके पुढील पिढ्यांमध्ये टिकून राहतात. याला ‘रॉयल चीटर्स’ (royal cheaters) असेही म्हणतात.