Eucalyptus Pine Trees | नीलगिरी आणि पाईन झाडांमुळे ३५ टक्क्यांपर्यंत पाणी घटले!

उरुग्वेतील संशोधनात धक्कादायक खुलासा
Eucalyptus Pine Trees |
Eucalyptus Pine Trees | नीलगिरी आणि पाईन झाडांमुळे ३५ टक्क्यांपर्यंत पाणी घटले!
Published on
Updated on

लंडनः वृक्षारोपण करणे आणि निसर्गाचे जतन करणे याला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. मात्र, उरुग्वेमधून समोर आलेल्या एका वृत्ताने झाडे लावण्यापूर्वी योग्य अभ्यास आणि विचार करणे किती गरजेचे आहे, हे स्पष्ट केले आहे. उरुग्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्षारोपणाचा निसर्गालाच फटका बसल्याचे समोर आले आहे. या झाडांमुळे परिसरातील पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले असून, २० वर्षांनंतर शास्त्रज्ञांना याचे मुख्य कारण समजले आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी उरुग्वेमध्ये हिरवाई वाढवणे, निसर्गाचे संवर्धन करणे आणि लाकूड व्यवसायाला चालना देऊन अर्थव्यवस्थेला बळकट करणे या उद्देशाने नीलगिरी (Eucalyptus) आणि पाईन (Pine) या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. या झाडांमुळे हिरवळ तर वाढली; पण या वनस्पतींनी परिसरातील पाण्याचे प्रमाण थेट ३५ टक्क्यांपर्यंत कमी केले.

जवळपासच्या नद्या आणि पाण्याच्या स्रोतांमधील पाणी लक्षणीयरीत्या घटल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक बनली होती. शास्त्रज्ञांनी तपास केला असता, हे लक्षात आले की, ही सर्व झाडे पूर्वी असलेल्या संपूर्ण गवताळ प्रदेशात लावली गेली होती. ‘हायड्रोलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ अफॉरेस्टेशन इन उरुग्वे: अ २०-इयर वॉटरशेड स्टडी’ या अभ्यासानुसार, सन २००० मध्ये पाण्याचे स्रोत असलेल्या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. यातील एक भाग तसाच कुरणाचा प्रदेश ठेवण्यात आला, तर दुसऱ्या भागात लोबलोली पाईन (Loblolly Pine) ची झाडे लावली गेली. अभ्यासाच्या शेवटी, ज्या भागात झाडे लावली गेली होती तेथे पाण्याचे पुनरुज्जीवन आणि निर्मिती खूपच कमी झाली.

झाडे लावल्यानंतर लगेचच हा फरक जाणवू लागला होता. नीलगिरी आणि पाईनची झाडे वाढण्यासाठी गवताच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात पाणी शोषून घेतात. पाईनची मुळे जमिनीच्या खूप खोलवर जातात. त्यामुळे ज्या भागात ही झाडे लावली गेली, तेथे पाण्याचा उपसा वेगाने झाला. अभ्यासानुसार, लागवडीनंतर ४ वर्षांतच पाण्याच्या पातळीत फरक दिसू लागला होता आणि १२ वर्षांनंतर ही तफावत प्रचंड वाढली. उरुग्वेच्या या उदाहरणावरून पाईन किंवा नीलगिरीची झाडे जगात कुठेही लावली, तरी पाण्याचा पुरवठा एवढाच कमी होईल असे नाही. कारण, हे स्थानिक हवामान, माती आणि वनस्पतींच्या वाढीवर अवलंबून असते. परंतु, स्थानिक परिसंस्थेचा विचार न करता केलेले वृक्षारोपण निसर्गासाठी कसे घातक ठरू शकते, हे या संशोधनाने सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news