

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ जगातील सर्व क्षेत्रांवर आपला प्रभाव पाडत असताना दिसत आहे. जगातील कोणतेही क्षेत्र एआयपासून आता दूर राहू शकणार नाही, असे एआयमधील तज्ज्ञ सांगत आहेत. एआयचे फायदे आणि तोटेही आहेत. पण जास्तीत जास्त फायदा करुन देणार्या एआय मॉडेलची मदत घेणे, योग्य ठरते. एआयच्या वापरतामुळे प्रचंड ऊर्जा खर्च होते हे खरे असले, तरी पर्यावरण रक्षणासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एआयचा उपयोग करता येतो. तो कसा करावा, यासाठी संशोधकांनी काही मुद्दे मांडले आहेत.
एआय अल्गोरिदम ऊर्जा ग्रीडमधील मागणी आणि पुरवठा यांचा अचूक अंदाज लावू शकतात. एआय तंत्रज्ञान सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अस्थिर नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांचे उत्पादन आणि वितरण कार्यक्षमतेने व्यवस्थापित करते. यामुळे ऊर्जा वाया (वेस्टेज) जाणे कमी होते आणि गरजेनुसार ऊर्जा वितरित केली जाते. यामुळे जीवाश्म इंधनावर (फोसिल फ्युअल) आधारित पॉवर प्लांटची आवश्यकता कमी होऊन कार्बन उत्सर्जन (कार्बन इमिशन) घटते.
वाहतूक (ट्रान्सपोर्ट) हा कार्बन उत्सर्जनाचा एक प्रमुख स्रोत आहे. एआय यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिग्नल लाईटस्चे व्यवस्थापन करते. शहरातील सार्वजनिक वाहतूक प्रणाली (पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम) आणि मालवाहतूक (लॉजिस्टिक्स) मार्गांचे (रुटस) नियोजन करते, जेणेकरून कमी वेळेत आणि कमी इंधनाचा वापर करून वस्तूंची वाहतूक होईल. यामुळे वाहनांद्वारे होणारे इंधन ज्वलन (फ्युअल बर्निंग) आणि पर्यायाने प्रदूषण (पोल्युशन) कमी होते.
जंगलतोड, पाणी आणि शेती व्यवस्थापनसारख्या क्षेत्रांमध्ये एआय मोठी मदत करू शकते. उपग्रह डेटा (सॅटेलाईट डेटा) आणि प्रतिमांचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा वापर केला जातो. ज्यामुळे जंगलतोड आणि बेकायदेशीर मासेमारी यावर रिअल-टाईममध्ये लक्ष ठेवता येते. शेतीमधील मातीची गुणवत्ता आणि हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना किती पाणी आणि खत आवश्यक आहे हे सांगते. यामुळे पाण्याची आणि खतांची बचत होते, तसेच पर्यावरणावरील रासायनिक प्रदूषणाचा ताण कमी होतो.
गुंतागुंतीच्या हवामान प्रणाली समजून घेण्यासाठी एआय हे एक शक्तिशाली साधन आहे. एआय प्रचंड मोठ्या हवामान डेटासेटचे विश्लेषण करून दीर्घकालीन हवामान बदलाचे मॉडेलिंग करते. हे तंत्रज्ञान पूर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज वर्तवते, ज्यामुळे आपत्कालीन तयारीसाठी मदत होते. अधिक अचूक मॉडेल्समुळे सरकार आणि धोरणकर्त्यांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रभावी आणि वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.
एआय औद्योगिक उपकरणांच्या डेटाचे निरीक्षण करते. उदा. यंत्रांना कधी देखभाल आवश्यक आहे, हे ते वेळेआधीच सांगते. त्यामुळे मोठे बिघाड टळतात. उत्पादन प्रक्रियेत कचरा आणि ऊर्जेचा वापर कमी करते. कमी ऊर्जेचा वापर आणि कमी कचरा म्हणजे कमी प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण. जरी एआयला प्रचंड ऊर्जा लागली, तरी ते ऊर्जा व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधने आणि औद्योगिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते.