

जिनिव्हा : रोबो तुमच्यासाठी स्वयंपाक करू शकतो किंवा तुम्हाला जेवण भरवू शकतो, हे तुम्ही ऐकले असेल. पण, तुम्हाला माहीत आहे का, की आता चक्क रोबोच खाता येऊ शकतो? हे एक खाद्य रोबोटिक तंत्रज्ञान (edible robotic technology) आहे, जे पूर्णपणे खाण्यायोग्य आहे. रोबोसोबत त्याची बॅटरी देखील खाता येते. स्विस रिसर्च इन्स्टिट्यूट EPFL (Ecole Polytechnique Fédérale de Lausanne) च्या वैज्ञानिकांनी एक असा रोबो तयार केला आहे, जो पूर्णपणे खाण्यायोग्य आहे. या रोबोला गिळता किंवा चघळता देखील येते.
हा रोबो प्रामुख्याने रानडुकरासारख्या प्राण्यांना औषधे किंवा पोषण देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे; पण तो माणसाला खाताही येऊ शकतो. रोबोटिक्सच्या क्षेत्रात ही एक मोठी उपलब्धी आहे. कारण, आतापर्यंत कोणताही रोबो पूर्णपणे खाण्यायोग्य नव्हता. रोबोमधील बॅटरी आणि मोटरसारखे भाग विषारी असायचे. तथापि, या रोबोची बॅटरीदेखील खाण्यायोग्य आहे. खाद्य रोबोमधील मोठी आव्हाने आता पार करण्यात आली आहेत.
वैज्ञानिकांसमोर सर्वात मोठे आव्हान हे होते की, प्लास्टिक आणि धातूचा वापर न करता ते कसे बनवायचे. मऊ आणि खाण्यायोग्य अॅक्च्युएटर चालवण्यासाठी गॅस प्रेशरची आवश्यकता असते. त्यासाठी पंप आणि वाल्व्हची गरज असते, जे प्लास्टिक आणि धातूशिवाय बनवणे कठीण होते. एझऋङ (स्वित्झर्लंड) मधील दारियो फ्लोरानो यांच्या इंटेलिजेंट सिस्टम्स लॅबोरेटरीच्या संशोधकांनी एक नवीन पेपर प्रकाशित केला, ज्यात त्यांनी बॅटरी आणि अॅक्च्युएटर या दोन्हीच्या खाता येणार्या आवृत्त्या दर्शविल्या आहेत. या रोबोचा एक संभाव्य उपयोग म्हणजे रानडुकरासारख्या पकडण्यास कठीण असलेल्या प्राण्यांना पोषण किंवा औषधे देणे.
रानडुक्कर जिवंत, हलणार्या शिकारीकडे आकर्षित होतात. याचा अर्थ असा की, रोबोमध्ये स्वाईन फ्लू लससारखी कोणतीही गोष्ट ठेवून त्याला खाऊ घातले जाऊ शकते. या रोबोचे फायदे असे ः तो बनवण्यासाठी स्वस्त आहे. तो पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. तो हालचाल करीत असल्यामुळे प्राणी आकर्षित होतात. याचा वापर अशा प्राण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जाऊ शकतो, जिथे मानवांना जाणे शक्य नसते. रोबोची बॅटरी जिलेटिन आणि मेणापासून बनवलेली आहे. ती साइट्रिक अॅसिड आणि बेकिंग सोडा असलेल्या कप्प्यांमध्ये रासायनिक ऊर्जा साठवते.
हे दोन्ही पदार्थ खाण्यायोग्य आहेत. साईट्रिक अॅसिडला एका पडद्याद्वारे बेकिंग सोड्यापासून वेगळे ठेवले जाते. अॅसिड असलेल्या कप्प्यावर दाब दिल्यावर तो फाटतो. त्यामुळे अॅसिड हळूहळू बेकिंग सोड्यावर थेंब थेंब पडते, ज्यामुळे बॅटरी सक्रिय होते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करू लागते. (सोबतच सोडियम सायट्रेट देखील तयार होते, जे अनेक खाद्यपदार्थांमध्ये आढळते.) कार्बन डायऑक्साईड गॅस जिलेटिनच्या नळ्यांमधून अॅक्च्युएटर पर्यंत जातो. अॅक्च्युएटरमध्ये वरच्या बाजूला गॅसचे कप्पे आणि खाली एक कडक बेस असतो. कप्प्यांमध्ये दाब पडल्याने बेस वाकतो आणि रोबोची एकदाची हालचाल पूर्ण होते.
सतत हालचाल करण्यासाठी गॅस वारंवार सोडला जाणे आवश्यक आहे. हे काम करण्यासाठी खाण्यायोग्य वाल्व्हचा वापर करण्यात आला आहे. हा वाल्व्ह ‘स्नॅप-बकलिंग‘ च्या तत्त्वावर कार्य करतो, म्हणजेच तो आपल्या बंद स्थितीत सर्वाधिक स्थिर असतो; परंतु त्यावर दाब दिल्यास तो वेगाने उघडतो आणि दाब कमी झाल्यावर पुन्हा बंद होतो. अशा प्रकारे, एक खाण्यायोग्य बॅटरी, एक वाल्व्ह आणि एक अॅक्च्युएटर एकत्र येऊन एक खाण्यायोग्य रोबो तयार करतात.