

मॉस्को : सहसा ‘हिमवादळ’ हा शब्द ऐकल्यावर किंवा वाचल्यानंतर यामध्ये वादळाचा असणारा उल्लेख पाहता त्याची तीव्रता लक्षात येते. मात्र, प्रत्यक्षात हे हिमवादळ कोणत्या स्वरूपातील असतं आणि ते धडकल्यास नेमकी काय स्थिती उद्भवते याची प्रचिती नुकतीच संपूर्ण जगाला आली आहे. रशियात हिमवादळामुळे अख्खंच्या अख्खं शहरच बर्फाखाली दबल्याचं पाहायला मिळालं.
रशियाच्या अतिपूर्वेला असणार्या कामचटका पेनिन्स्युला इथे 17 जानेवारी रोजी हे अतिप्रचंड हिमवादळ धडकले, ज्यातून हे शहर अद्यापही सावरू शकलेले नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील 60 वर्षांमधील ही सर्वाधिक हिमवृष्टी असून, शहरातील बहुतांश भागांमध्ये सोळा फूट बर्फाचे थरच्या थर जमल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे काही इमारतींचे बाहेर येण्याचे मार्ग बंद झाल्याने नागरिक आहेत तिथेच अडकले. घराबाहेर पडण्यासाठी अनेक नागरिकांना खोदकाम करत जमलेल्या बर्फाच्या ढिगार्यातून वाट काढावी लागली.
अनेकांची वाहने या ढिगार्याखाली अडकली. निसर्गाने हे रौद्ररूप धारण केलेले असतानाच वादळ शांत झाल्यानंतर बर्फाच्या या ढिगार्याकडे एक संकट म्हणून न पाहता नागरिकांनी यातूनही एक वाट काढली. कामचटका इथे डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या हिमवर्षावाच्या तुलनेत तिप्पट अधिक हिमवर्षाव जानेवारीत झाल्यामुळे हिमवादळाची कधीही न पाहिलेली भीषणता नागरिकांनी अनुभवली. काहींनी या बर्फाच्या ढिगार्यावर चक्क घसरगुंडीचाही आनंद घेतला. शहरातील अनेक रस्ते बर्फामुळे बंद असताना आणि बाजारहाट किंवा तत्सम गोष्टींसाठी कोणताही वाव नसताना नागरिकांनी आपलाच विरंगुळा म्हणून या बर्फाच्छादित भागातही आनंदाच्या वेगळ्या वाटा निवडल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार 70 च्या दशकानंतर झालेली ही सर्वात मोठी हिमवृष्टी असून, यामध्ये काही दुर्घटनांची नोंदही करण्यात आली आहे. जिथे दोन नागरिकांचा मृत्यू छतावरील बर्फ पडून झाला आहे. ही परिस्थिती भीषण असून, प्रशासनाने आणीबाणीसुद्धा घोषित केली आहे. कामचटका आणि नजीकच्या भागातील शाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हवाई प्रवास ठप्प झाला असून, यातून सावरण्यासाठी आणखी काही दिवस जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कामचटका हे ठिकाण पॅसिफिक महासागर आणि ओखोत्साक समुद्रादरम्यान असून, येथील भौगोलिक स्थिती आणि हवामानाची एकंदर स्थिती पाहता हिमवृष्टीसाठी इथे अतिशय पूरक वातावरण आहे. इथे येणार्या चक्रीवादळामुळे हवामानातील दमटपणा वाढतो आणि थंड वार्यांशी एकरूप होऊन इथे हिमवर्षाव होतो. कामचटका येथील पर्वत आणि ज्वालामुखी यामुळे दमट हवा पर्वतांशी आदळून उंचावर जाते आणि थंड वार्यामुळे या दमटपणाचे बर्फात रूपांतर होते.