

लंडन : इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स येथे गटारातील सांडपाणी रस्त्यावर येऊन घरांमध्ये शिरण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. ‘सदर्न वॉटर’ या पाणीपुरवठा कंपनीने गटार व्यवस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तैनात केले असून, या तंत्रज्ञानामुळे अनेक घरे पुराच्या धोक्यातून वाचली आहेत.
हे एआय तंत्रज्ञान गटारांच्या सामान्य प्रवाहाचा अभ्यास करते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार, जसे की सकाळ आणि संध्याकाळच्या वापरामुळे होणारा बदल, पावसामुळे वाढलेले पाणी आणि नव्याने तयार होणारा अडथळा यातील फरक ते अचूकपणे ओळखू शकते. याच तंत्रज्ञानाचा वापर करून 16 जून रोजी पेटवर्थजवळील ईस्ट लॅव्हिंग्टन येथील गटारात डिजिटल सेन्सर्सने ‘फॅटबर्ग’मुळे (चरबी आणि कचर्याचा गोळा) तयार झालेला एक मोठा अडथळा वेळीच ओळखला. त्यामुळे सांडपाणी नागरिकांच्या घरांमध्ये आणि बागेत शिरण्यापूर्वीच त्यावर तातडीने कारवाई करणे शक्य झाले.
सदर्न वॉटरचे प्रोअॅक्टिव्ह ऑपरेशन्सकंट्रोल मॅनेजर, डॅनियल मॅकएल्हिनी यांनी सांगितले की, ‘खूप उशीर होण्यापूर्वीच आम्ही शेकडो संभाव्य अडथळे ओळखत आहोत. कंपनीच्या मते, गटार तुंबणे हे प्रदूषण होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. मात्र, ‘एआय’ च्या वापरामुळे आता घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनांमध्ये 40 टक्के आणि घराबाहेर पूर येण्याच्या घटनांमध्ये 15 टक्के घट झाली आहे. यासाठी कंपनीने गटार व्यवस्थेत सुमारे 32,000 लेव्हल मॉनिटर्स बसवले आहेत, जे पाण्याच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवतात आणि कोणताही असामान्य बदल, जसे की अडथळा किंवा गळती त्वरित ओळखतात.