

अथेन्स : ग्रीसची राजधानी अथेन्सजवळील ‘ॲटिका झुलॉजिकल पार्क’मध्ये एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिल्याने जगभरातील वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. हे तिन्ही बछडे अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ‘सुमात्रन वाघ’ या प्रजातीचे आहेत. ही प्रजाती गंभीररीत्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या बछड्यांच्या जन्मामुळे या प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना मोठे यश आणि नवी उमेद मिळाली आहे. ग्रीसमधील हा जन्म एका आंतरराष्ट्रीय ब्रीडिंग (प्रजननात्मक) उपक्रमाचा भाग आहे.
ग्रीसच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही बछड्यांचा जन्म जुलैच्या सुरुवातीला झाला होता. यात दोन नर आणि एका मादी बछड्याचा समावेश आहे. मंगळवारी प्राणिसंग्रहालयाच्या वैद्यकीय पथकाने त्यांचा पहिला सविस्तर वैद्यकीय अहवाल जारी केला. ९ आठवड्यांच्या या बछड्यांचे वजन करून त्यांना आवश्यक थ्री-इन-वन लस देण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय ओळख पटवणारी मायक्रोचिपही बसवण्यात आली आहे. हे तिन्ही बछडे ‘टोबा’ (मादी) आणि ‘आर्गोस’ (नर) या वाघांच्या जोडीपासून जन्माला आले आहेत. मात्र दुःखाची बाब म्हणजे, बछड्यांचे वडील असलेल्या ‘आर्गोस’चा नुकताच कर्करोगाने मृत्यू झाला.
प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या बछड्यांची नावे प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या प्रसिद्ध ‘ओडिसी’ या महाकाव्यातील पात्रांवरून ठेवली जाणार आहेत. ‘पँथेरा टायग्रिस सुमात्रे’ (Panthera tigris sumatrae) म्हणून ओळखला जाणारा सुमात्रन वाघ हा प्रामुख्याने इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो. पाम तेलाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड आणि बेकायदेशीर शिकार यामुळे ही प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या सुमात्राच्या जंगलात ४० हून कमी वाघ उरले आहेत. वाघांच्या सर्व जिवंत प्रजातींमध्ये सुमात्रन वाघ आकाराने सर्वात लहान असतात.
पूर्ण वाढ झालेला नर वाघ ८.४ फूट (२.२५ मीटर) लांब आणि १४० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा असू शकतो. हे वाघ त्यांच्या चपळतेसाठी, उत्तम पोहण्याच्या क्षमतेसाठी आणि शरीरावरील बारीक पट्ट्यांसाठी ओळखले जातात. या पट्ट्या प्रत्येक वाघासाठी माणसाच्या फिंगरप्रिंटसारख्या अद्वितीय असतात. भारतीय वाघांच्या (बंगाल टायगर) तुलनेत सुमात्रन वाघांचा आकार खूप लहान असतो. भारतात आढळणारा पूर्ण वाढलेला नर बंगाल टायगर २.८३ मीटर ते ३.११ मीटरपर्यंत लांब असू शकतो, तर मादी २.५५ मीटर ते २.८५ मीटरपर्यंत लांब असते. तसेच, भारतीय नर वाघाचे वजन २०० ते २६० किलोग्रॅम आणि मादीचे वजन ११० ते १८० किलोग्रॅमपर्यंत असू शकते.