

टोकियो ः जपानमधील तोहो विद्यापीठाचे संशोधक आणि सुपर कॉम्प्युटरच्या सिम्युलेशन्सवर आधारित एका नवीन अभ्यासात असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की, पृथ्वीवरील ऑक्सिजन फक्त आणखी एक अब्ज वर्ष टिकेल. यानंतर पृथ्वीवर श्वास घेण्यायोग्य वायू उरणार नाही आणि त्यामुळे पृथ्वीवरील जीवन पूर्णतः नष्ट होईल.
या अभ्यासात ‘नासा’ च्या प्लॅनेटरी मॉडेलिंगचा वापर करण्यात आला आहे. याआधीच्या संशोधनांमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला होता की, पृथ्वीवरून जीवन दोन अब्ज वर्षांनी नष्ट होईल. मात्र, नवीन अभ्यासानुसार ही प्रक्रिया अधिक लवकर, म्हणजे एका अब्ज वर्षांतच घडणार आहे. या संशोधनासाठी 4 लाख सिम्युलेशन्स करण्यात आल्या. त्यातून असे दिसून आले की, सूर्य जसजसा ‘वृद्ध’ होत जाईल, तसतसा तो अधिक गरम होईल. याचा थेट परिणाम पृथ्वीच्या हवामानावर होईल. उष्णता वाढल्याने पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन आकाशात जाईल आणि त्यामुळे कार्बन चक्र खंडित होईल. यामुळे वनस्पती मरून जातील आणि ऑक्सिजन निर्मिती थांबेल. त्यानंतर पृथ्वीचा वायुमंडल मिथेनने भरून जाईल, जे आपल्या ग्रहाच्या सुरुवातीच्या अवस्थेसारखे असेल, जिथे ‘ग्रेट ऑक्सिडायझेशन इव्हेंट’ अद्याप झाला नव्हता. ‘द फ्यूचर लाईफस्पॅन ऑफ अर्थ्स ऑक्सिजनेटेड अॅटमॉस्फियर’ या शीर्षकाने हा अभ्यास नेचर जिओसाईन्स या नामवंत जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वीच्या ऑक्सिजनयुक्त वायुमंडलाचे आयुष्य आता फक्त एक अब्ज वर्षेच उरले आहे. प्रोफेसर काजुमी ओजकी म्हणाले, ‘पृथ्वीच्या बायोस्फिअरच्या (जीवसृष्टीच्या) आयुष्यावर कित्येक वर्षांपासून वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. सूर्याचा तेजस्वितेपणा आणि कार्बोनेट-सिलिकेट चक्र या दोन्ही गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात.’ ते पुढे म्हणाले, ‘पूर्वीच्या अभ्यासात असे मानले जात होते की, CO2 ची पातळी कमी झाल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवन दोन अब्ज वर्षांत संपेल. मात्र, या नवीन संशोधनात ही कालमर्यादा अर्ध्यावर आली आहे. आता असे स्पष्ट झाले आहे की, एका अब्ज वर्षांतच ऑक्सिजन आटेल. कारण, झाडे आणि वनस्पती सुकून जातील आणि प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया थांबेल.’