

किव : युक्रेनची सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी ‘कायवस्टार’ने एलन मस्क यांच्या ‘स्टारलिंक डायरेक्ट टू सेल’ या क्रांतिकारी सॅटेलाईट तंत्रज्ञानाची यशस्वी क्षेत्रीय चाचणी केली आहे. पूर्व युरोपमध्ये प्रथमच झालेल्या या चाचणीमुळे आता मोबाईल टॉवरशिवाय थेट सॅटेलाईटवरून सामान्य स्मार्टफोनवर नेटवर्क उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युद्धामुळे पायाभूत सुविधा उद्ध्ववस्त झालेल्या युक्रेनसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरू शकते, असे कंपनीने जाहीर केले.
स्टारलिंक बर्याच काळापासून या तंत्रज्ञानावर काम करत होते आणि आता अखेर या चाचणीला यश आले आहे. भविष्यातील या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, अशा दुर्गम भागांमध्ये विश्वसनीय कनेक्टिव्हिटी पुरवणे, हे ‘डायरेक्ट टू सेल’ तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात सॅटेलाईटमध्येच अत्यंत प्रगत मॉडेम बसवलेले असतात. हे मॉडेम जमिनीवरील मोबाईल टॉवरप्रमाणे काम करतात आणि थेट तुमच्या स्मार्टफोनला सिग्नल पाठवतात.
यामुळे जमिनीवरील मोबाईल टॉवरची गरज पूर्णपणे संपुष्टात येते. थोडक्यात, हे सॅटेलाईट ‘आकाशातील मोबाईल टॉवर’ म्हणून काम करतात. ही पथदर्शी चाचणी (पायलट टेस्ट) युक्रेनच्या झायटोमिर परिसरात करण्यात आली. या चाचणीदरम्यान, कायवस्टारचे सीईओ ओलेक्सांद्र कोमारोव आणि युक्रेनचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मिखाइलो फेदोरोव यांनी सामान्य स्मार्टफोन वापरून एकमेकांना यशस्वीरित्या मेसेज पाठवले. या चाचणीने हे सिद्ध केले की, कोणत्याही विशेष उपकरणांशिवाय थेट सॅटेलाईटवरून मोबाईल फोनवर सिग्नल पोहोचू शकतात. सध्या युक्रेन युद्धस्थितीतून जात आहे.
रशियाच्या हल्ल्यांमध्ये देशातील हजारो मोबाईल टॉवर्स आणि इतर दळणवळण सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, जिथे जमिनीवरील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत, तिथे थेट सॅटेलाईटवरून मिळणारी ही कनेक्टिव्हिटी नागरिकांसाठी, आपत्कालीन सेवांसाठी आणि सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कायवस्टारची ही यशस्वी चाचणी केवळ युक्रेनसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक मैलाचा दगड आहे. भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही संकटकाळात, जिथे पारंपरिक नेटवर्क निकामी होते, तिथे हे तंत्रज्ञान एक शक्तिशाली पर्याय म्हणून उदयास येईल. येत्या काळात जगभरात या तंत्रज्ञानाचा अवलंब वेगाने वाढण्याची शक्यता आहे.