Human Skin cell embryo | मानवी त्वचेच्या पेशींपासून बनवले बीजांड

Human Skin cell embryo
Human Skin cell embryo | मानवी त्वचेच्या पेशींपासून बनवले बीजांडPudhari File Photo
Published on
Updated on

पोर्टलँड (अमेरिका) : शास्त्रज्ञांनी मानवी त्वचेच्या पेशींचा वापर करून फलितक्षम बीजांडे (fertilizable eggs) यशस्वीरीत्या तयार केली आहेत, जी प्रारंभिक भ्रूण तयार करण्यास सक्षम आहेत. हे महत्त्वपूर्ण संशोधन वंध्यत्व उपचारांच्या भविष्यातील शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढवणारे ठरू शकते.

‘नेचर कम्युनिकेशन्स’ नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या ‘प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट’ अभ्यासात, संशोधकांनी सामान्य मानवी त्वचेच्या पेशींमधून केंद्रक, म्हणजेच पेशीचा तो भाग ज्यात बहुतेक जनुकीय माहिती असते, वेगळा केला. त्यानंतर हे केंद्रक, ज्याचे केंद्रक काढले आहे, अशा दात्याच्या अंड्यामध्ये (donor egg) प्रत्यारोपित केले. या प्रक्रियेतून संशोधकांनी एकूण 82 कार्यक्षम मानवी अंडपेशी ( immature egg cells) तयार केल्या, ज्यांवर नंतर प्रयोगशाळेत फलन (fertilization) केले गेले. या प्रयोगाचे यश म्हणजे, तयार झालेले अंडे हे त्वचेची पेशी देणार्‍या व्यक्तीसोबत डीएनए सामायिक (DNA shares) करते आणि ते दुसर्‍या व्यक्तीच्या शुक्राणूंनी फलित केले जाऊ शकते.

अभ्यासाच्या सहलेखिका आणि ओएचएसयू स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पॉला अमाटो यांच्या मते, हा वंध्यत्वावर नवीन द़ृष्टिकोन विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही प्रक्रिया क्लिनिकमध्ये उपलब्ध होण्यासाठी किमान एक दशक लागेल. डॉ. अमाटो यांनी सांगितले की, ‘यामुळे जास्त वयाच्या महिलांना, किंवा कोणत्याही कारणास्तव (उदा. कर्करोगावरील उपचार) बीजांड नसलेल्या महिलांना, जनुकीयद़ृष्ट्या संबंधित (genetically related) मूल जन्माला घालणे शक्य होईल.’ या संशोधकांसमोरचे मुख्य आव्हान म्हणजे, पुन्हा प्रोग्राम केलेल्या फलित अंड्यामध्ये गुणसूत्रांची योग्य संख्या असल्याची खात्री करणे.

त्वचेच्या पेशींसारख्या सामान्य मानवी पेशींमध्ये 46 गुणसूत्र असतात. परंतु, लैंगिक पेशींमध्ये (अंड आणि शुक्राणू) याच्या निम्मी, म्हणजेच प्रत्येकी 23 गुणसूत्रे असतात. पोर्टलँडमधील ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटी (OHSU) येथील पथकाने एक अशी पद्धत विकसित केली, ज्यामुळे अतिरिक्त गुणसूत्र काढून टाकली जातात. त्यांनी नैसर्गिक पेशी विभाजनाचे अनुकरण करून 23 गुणसूत्रांचा एक संच बाहेर काढला, ज्यामुळे एक कार्यक्षम अंडपेशी तयार झाली. या प्रक्रियेला संशोधकांनी ‘मायटोमेओसिस‘ असे नाव दिले आहे. अभ्यासादरम्यान तयार झालेल्या अंड्यांपैकी 9% पेक्षा कमी अंडी भ्रूण विकासाच्या ब्लास्टोसिस्ट टप्प्यापर्यंत पोहोचली (फलनानंतरचे पाच किंवा सहा दिवस).

‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (IVF) उपचारात याच टप्प्यावर भ्रूण गर्भाशयात सोडले जातात. डॉ. अमाटो यांनी स्पष्ट केले की, तयार झालेले सर्व भ्रूण गुणसूत्रद़ृष्ट्या असामान्य (chromosomally abnormal) होते. एकतर त्यांच्यात एकूण गुणसूत्रांची संख्या चुकीची होती किंवा प्रत्येक जोडीतून एक गुणसूत्र नव्हते. अशा भ्रूणांपासून निरोगी बाळं जन्माला येण्याची अपेक्षा नाही आणि त्यांचा विकास लवकरच थांबण्याची शक्यता आहे. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, हे तंत्रज्ञान क्लिनिकमध्ये वापरण्यापूर्वी ते सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी व्यापक अतिरिक्त संशोधन करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news