

वॉशिंग्टन : एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ‘स्टारशिप’ या महाकाय रॉकेटने शुक्रवारी हिंदी महासागरात यशस्वीरीत्या ‘स्प्लॅशडाउन’ (पाण्यात लँडिंग) केले. कंपनीच्या या अवाढव्य रॉकेटच्या नवीन आवृत्तीची ही चाचणी बर्याच अंशी यशस्वी ठरली. सुमारे एक तास चाललेली ही मोहीम अखेर हिंद महासागरात नियोजित स्थळी एका मोठ्या धमाक्यासह समाप्त झाली.
स्टारशिपच्या मोठ्या ‘त3’ मॉडेलचे हे पहिलेच उड्डाण होते, ज्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. टेक्सासच्या दक्षिण टोकावर असलेल्या स्पेसएक्सच्या ‘स्टारबेस’ प्रक्षेपण केंद्रावरून उड्डाण केल्यानंतर या मोहिमेत अनेक चढ-उतार आले. रॉकेटने उड्डाण केल्यानंतर मेक्सिकोच्या खाडीवरून वेगाने प्रवास केला. जवळपास तासाभरानंतर यानाचा वरील भाग हिंद महासागरात कोसळला. उड्डाणादरम्यान यानाच्या इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाल्यामुळे यान नष्ट होण्याचा धोका वारंवार निर्माण होत होता, तरीही यानाने आपले लक्ष्य गाठले.
गुरुवारी झालेल्या अयशस्वी प्रयत्नाच्या उलट, शुक्रवारी काउंटडाउनदरम्यान कोणतीही अडचण आली नाही. स्टारशिपचा ‘लॉन्च विंडो’ सुरू होताच वेळेवर झेप घेतली आणि त्याची सर्व 33 ‘रॅप्टर’ इंजिने पूर्ण क्षमतेने सुरू झाली. काही तांत्रिक त्रुटी समोर आल्या तरी चाचणी यशस्वी झाल्याचे पाहून स्पेसएक्सच्या कर्मचार्यांनी एकच जल्लोष केला. एलॉन मस्क यांच्या मालकीची ही कंपनी येत्या जून महिन्यात आपला रेकॉर्ड-ब्रेक ‘आयपीओ’ आणण्याच्या तयारीत असतानाच ही यशस्वी चाचणी झाली आहे.
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर या रॉकेटने अंतराळाच्या दिशेने उड्डाण केले होते. कंपनीचा बूस्टर किंवा वरील भाग सुरक्षित परत आणण्याचा कोणताही हेतू नव्हता. योजनेनुसार अंतिम स्प्लैशडाउन आगीच्या ज्वाळांसह परंतु पूर्णपणे नियंत्रित पद्धतीने झाले. कंपनीने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून या लँडिंगला दुजोरा दिला आहे. या मोहिमेत स्पेसएक्सचा मुख्य उद्देश नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञानाची चाचणी घेणे हा होता.