

टेक्सास : स्पेसएक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी वैद्यकीय क्षेत्राबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. ‘येत्या काही वर्षांत मेडिकल कॉलेजला जाणे पूर्णपणे व्यर्थ ठरेल,’ असे भाकीत मस्क यांनी वर्तवले असून, त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘एक्स प्राईज फाऊंडेशन’चे कार्यकारी अध्यक्ष पीटर डायमंडिस यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मस्क यांनी शिक्षण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यावर आपली मते मांडली. मस्क यांच्या मते, एक उत्तम डॉक्टर होण्यासाठी बराच काळ लागतो; पण तंत्रज्ञानाचा वेग पाहता भविष्यात मानवी डॉक्टरांपेक्षा एआय रोबो अधिक चांगली सेवा देतील.
जेव्हा डायमंडिस यांनी विचारले की, ‘तर मग मुलांनी मेडिकल स्कूलला जाऊ नये का?’ त्यावर मस्क यांनी स्पष्टपणे ‘हो, ते व्यर्थ आहे,’ असे उत्तर दिले. एलन मस्क यांनी त्यांच्या या दाव्यामागे काही तांत्रिक कारणे दिली आहेत: ज्ञानाचे अद्ययावतीकरण : वैद्यकीय ज्ञान सातत्याने बदलत असते. मानवी डॉक्टरांना या सर्व बदलांशी जुळवून घेणे कठीण जाते; पण एआय साठी ते सहज शक्य आहे. ऑप्टिमस रोबोची ताकद : मस्क यांच्या मते, त्यांचे ‘ऑप्टिमस’ सारखे ह्युमनॉईड रोबो भविष्यात जगातील सर्वोत्कृष्ट सर्जनपेक्षाही अधिक अचूक शस्त्रक्रिया करतील. ट्रिपल एक्स्पोनेंशियल ग््राोथ: एआय सॉफ्टवेअरचा वेग, चिप परफॉर्मन्स आणि मेकॅनिकल सोफिस्टिकेशन या तिन्ही गोष्टींचा वेग एकत्रितपणे वाढल्यामुळे रोबो मानवापेक्षा कित्येक पटीने पुढे जातील.
मस्क यांनी असा दावा केला की, ‘पुढील तीन वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलेल. आज एखाद्या देशाच्या राष्ट्रपतींना जी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळते, त्यापेक्षाही दर्जेदार सुविधा सर्वसामान्यांना एआयमुळे घरबसल्या मिळेल. चार वर्षांत एआय जवळपास सर्व मानवांपेक्षा श्रेष्ठ असेल आणि पाच वर्षांत त्याची तुलना कोणाशीही होऊ शकणार नाही.’ मस्क यांच्या या विधानावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर म्हणाला : ‘हे ते कडू सत्य आहे जे कोणालाही ऐकायचे नाही. एआय इतक्या वेगाने वैद्यकाय सुविधा मोफत आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देईल की, आज मेडिकल स्कूलमध्ये जाणे खरोखरच व्यर्थ वाटू लागेल.’ मात्र, दुसरीकडे अनेक तज्ज्ञांनी मानवी संवेदना, अनुभव आणि प्रत्यक्ष स्पर्शाची जागा मशिन कधीही घेऊ शकत नाही, असे म्हणत मस्क यांच्या विधानावर टीका केली आहे.