

वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांच्या श्रीमंतीसमवेत आणखी एक चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे त्यांचं खासगी आयुष्य. नुकतंच मस्क यांनी एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय, ज्यामध्ये सर्वात चर्चेत राहून गेलेला मुद्दा ठरला मस्क यांच्या खासगी आयुष्याबद्दलचा. प्रचंड श्रीमंती असणार्या मस्क यांच्या एकाहून अधिक पार्टनरपैकी एक पार्टनर ही भारतीय वंशाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपली पार्टनर आणि ‘न्यूरालिंक’ची अधिकारी शिवोन जिलिस ही भारतीय वंशाची असून, आपण तिच्या-आपल्या मुलाचं नाव ‘शेखर’ असं ठेवल्याचंही ते म्हणाले. प्रसिद्ध भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते सुब्रमण्यन चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ मस्क यांनी हे नाव निवडलं. शिवाय, त्यांनी अमेरिकेत कैक भारतीयांनी दिलेल्या योगदानाकडेही सर्वांचं लक्ष वेधलं.
झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथशी संवाद साधताना मस्क यांनी आपली पार्टनर शिवोन जिलिस हिच्याबद्दलसुद्धा अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. ‘माझी पार्टनर शिवोन, ती अर्धी भारतीय आहे, शिवोनच्या एका मुलाचं नाव शेखर आहे,’ असं मस्क म्हणाले. महान भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञ सुब्रमण्यन चंद्रशेखर यांच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं असून, त्यांना 1983 मध्ये ‘नोबेल’ पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं. शिवोन कधी भारतात आलीये का? असं विचारलं असता, तिच्या वडिलांचा वंश भारतातीलच आहे; मात्र ती भारतात मोठी झालेली नाही, असं मस्क यांनी सांगितलं. शिवोन कॅनडामध्ये मोठी झाली असून, तिला लहानपणीच दत्तक घेण्यात आलं होतं. असं म्हणतात की, तिचे खरे वडील एकेकाळी विश्वविद्यालयात एक्स्चेंज स्टुडंट होते; पण आपल्याला याबद्दलची सविस्तर माहिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मस्क यांची जवळची सहकारी असणारी शिवोन जिलिस अनेक वर्षांपासून टेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्यरत आहे. 2017 मध्ये ती ‘न्यूरालिंक’शी जोडली गेली आणि आजच्या घडीला ती या कंपनीमध्ये ऑपरेशन, स्पेशल प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. शिवोनचा जन्म आणि तिचं संगोपन कॅनडातील ओंटारियोमध्ये झालं. येल विद्यापीठातून तिनं अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. आईस हॉकीमध्ये ती गोलकीपरही होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं आयबीएम आणि ‘ब्लूमबर्ग’मध्ये काम करत स्टार्टअप पार्टनरशिपचीही जबाबदारी सांभाळली.