

वॉशिंग्टन : मेंदूतील मृतवत पण पूर्णपणे नष्ट न झालेल्या, ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘अनडेड’ किंवा ‘झोम्बी’ पेशी म्हटले जाते, त्यांचा नायनाट केल्यास अपस्माराच्या एका सामान्य प्रकारावर उपचार करणे शक्य असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
‘अॅनाल्स ऑफ न्युरोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात प्रामुख्याने ‘टेम्पोरल लोब एपिलेप्सी’ वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात सामान्य फिटस्चा आजार असून, जगभरात सुमारे 5 कोटी लोक यामुळे बाधित आहेत. उंदरांवर केलेल्या प्रयोगादरम्यान असे दिसून आले की, मेंदूतील या खराब झालेल्या पेशी काढून टाकल्यामुळे त्यांच्या स्मृतिमध्ये सुधारणा झाली आणि फिटस् येण्याचे प्रमाणही कमी झाले. जेव्हा मेंदूतील पेशींचे नुकसान होते, तेव्हा सामान्यतः त्या स्वतःहून नष्ट होतात. मात्र, काही पेशी नष्ट न होता ‘सेनेसन्स’ नावाच्या अवस्थेत जातात. या पेशी निरोगी पेशींसारख्या विभागल्या जात नाहीत, पण त्या मरतही नाहीत. म्हणूनच शास्त्रज्ञ त्यांना ‘झोम्बी पेशी’ म्हणतात.
या पेशींमुळे मेंदूच्या उतींवर जखमांच्या खुणा तयार होतात, ज्यामुळे फिटस् येण्याची शक्यता वाढते. जॉर्जटाऊन विद्यापीठातील औषधशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे सह-लेखक पॅट्रिक फोर्सेली यांनी सांगितले की, संशोधकांनी अपस्मार असलेल्या रुग्णांच्या मेंदूच्या ऊतींचा अभ्यास केला. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत अपस्मार असलेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये या ‘झोम्बी’ पेशींचे प्रमाण पाच पटीने जास्त असल्याचे आढळले. सध्याची औषधे केवळ फिटस्ची तीव—ता कमी करतात, परंतु, आजार मुळापासून बरा करत नाहीत. हे नवीन संशोधन अशा औषधांच्या निर्मितीसाठी मार्ग मोकळा करू शकते, जे आजाराच्या कारणावरच थेट उपचार करतील.
रुग्णांसाठी आशेचा किरण
अनेकांना डोक्याला मार लागल्यामुळे किंवा संसर्गामुळे अपस्माराचा त्रास होतो. सध्या अनेक रुग्णांना औषधांचा फायदा न झाल्यामुळे मेंदूची शस्त्रक्रिया किंवा ‘नर्व्ह-स्टिम्युलेशन’ उपकरणांचा आधार घ्यावा लागतो. या संशोधनामुळे आता शस्त्रक्रियेशिवाय ‘झोम्बी पेशी’ नष्ट करून उपचार करण्याच्या नवीन पद्धती विकसित होऊ शकतात.