

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी एक इलेक्ट्रॉनिक, तात्पुरता चेहर्यावरील टॅटू विकसित केला आहे. हा टॅटू वापरकर्त्याच्या कामाचा मानसिक ताण मोजण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हवाई वाहतूक नियंत्रणासारख्या उच्च मानसिक दबावाच्या नोकरीमध्ये काम करणार्या व्यक्तींना विश्रांतीची गरज आहे, हे या टॅटूमुळे लवकर लक्षात येऊ शकते.
गेल्या वर्षभरात, जास्त काम केलेल्या कर्मचार्यांवर कामाचा जास्त ताण आल्यामुळे काही मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. जानेवारीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली, ज्यात हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानाची टक्कर झाली आणि 55 लोकांचा मृत्यू झाला. रेगन नॅशनल एअरपोर्ट टॉवरमधील कर्मचार्यांची संख्या ‘सामान्य’ नव्हती आणि एकच हवाई वाहतूक नियंत्रक अनेक नियंत्रकांचे काम करत होते, तेव्हा ही घटना घडली. या घटनेमुळे अनेक समस्या समोर आल्या आहेत. विशेषत:, कामाचा अधिक ताण असणार्या नोकर्यांमध्ये मानसिक ताण मोजण्यासाठी चांगल्या प्रणालीची गरज आहे.
नवीन ‘ई-टॅटू’ विकसित करणार्या वैज्ञानिकांनी सांगितले की, हा टॅटू लावल्याने डोक्याच्या पुढच्या भागातून निघणार्या मेंदूच्या लहरी ओळखता येतात आणि त्या माहितीचा उपयोग करून मानसिक ताण किती आहे, हे तपासता येते. निर्मात्यांचे म्हणणे आहे की, त्यांची प्रणाली सध्याच्या पद्धतींपेक्षा जलद आणि अधिक अचूक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास (यूटी) ऑस्टिन येथील अभियांत्रिकीचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे सहलेखक नानशु लू यांनी सांगितले की, सध्या मानसिक कामाचा ताण मोजण्यासाठी स्वयं-अहवाल ही सर्वोत्तम पद्धत आहे. म्हणजेच, लोक त्यांच्या स्वतःच्या थकव्याचे निरीक्षण करतात आणि जेव्हा त्यांना जास्त ताण येतो तेव्हा ते सांगतात; पण दुर्दैवाने, ‘माणसे त्यांच्या स्वतःच्या मानसिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यात तितकी चांगली नसतात,’ असे लू यांनी सांगितले. त्यामुळे, संशोधकांनी मेंदूच्या हालचालींची नोंद करून मानसिक थकवा मोजण्याचे प्रयत्न केले आहेत.
मेंदूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी). या तंत्रामध्ये डोक्यावर इलेक्ट्रोड लावून विद्युत सिग्नल मोजले जातात. पारंपरिक ‘ईईजी’ उपकरणे शॉवर कॅपसारखी दिसतात; पण इलेक्ट्रोड व्यवस्थित लावण्यासाठी डोक्याला जेल लावावे लागते. याशिवाय, कॅपच्या इलेक्ट्रोडमधून मशिनपर्यंत अनेक वायर जोडाव्या लागतात, ज्यामुळे सहभागी व्यक्तीच्या डोक्यावर इलेक्ट्रिकल साहित्याचे मोठे ओझे असल्यासारखे दिसते. लू यांच्या नवीन प्रणालीमध्ये, डिस्पोजेबल, पॉलिमर-आधारित स्टिकर वापरले जाते. हे स्टिकर वापरकर्त्याच्या चेहर्याच्या आकारानुसार तयार केले जाते. यासोबत, एक हलकी बॅटरी आणि इलेक्ट्रोड प्रणाली वापरली जाते, जी वापरकर्त्याच्या कपाळावरील मेंदूच्या लहरींची नोंद करते. मेंदूच्या लहरी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये येतात, जसे की डेल्टा आणि थीटा (मंद) अल्फा, बीटा आणि गामा (वेगवान). मागील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मानसिक ताण आणि मेंदूच्या लहरींच्या विशिष्ट प्रकारांमध्ये संबंध आहे. लू आणि सेंटिस यांनी त्यांच्या उपकरणाची चाचणी करण्यासाठी एक छोटा पायलट अभ्यास केला. सहा सहभागींना डोक्यावर कॅप लावून एक स्मरणशक्ती चाचणी करण्यास सांगितले. प्रत्येक फेरीत चाचणीची कठीण पातळी वाढवण्यात आली. आव्हान वाढल्यामुळे, सहभागींच्या डेल्टा आणि थीटा लहरींची शक्ती वाढली, तर अल्फा, बीटा आणि गामा लहरी कमी झाल्या. हे निष्कर्ष वाढलेल्या मानसिक ताणाचे निर्देशक आहेत. हा डेटा मशिन लर्निंग मॉडेलमध्ये टाकला गेला, ज्याने प्रत्येक सहभागी व्यक्तीला वेगवेगळ्या कामांच्या अडचणींमध्ये आलेला मानसिक ताण किती आहे, याचा अंदाज लावला. मॉडेलने दिलेले अंदाज ‘नासा’ टास्क लोड इंडेक्सद्वारे मोजल्याप्रमाणे, सहभागींनी स्वतःहून दिलेल्या माहितीशी जुळले.