

कैरो : इजिप्तमधील गिझाचे पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. गिझाचे पिरॅमिड कोणी बांधले याबद्दल अनेक दावे केले जात आहेत. गिझाचे पिरॅमिड एक लाख गुलामांनी बांधले होते, असा दावा नेहमीच केला जातो. मात्र, संशोधकांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 4500 वर्षांपूर्वीचे सर्वात मोठे रहस्य उलगडले आहे. पिरॅमिडच्या आत सापडलेल्या काही थडग्यांच्या आधारे हा शोध लावण्यात आला आहे. डॉ. झही हवास आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने संशोधनात हा नवीन खुलासा केला आहे. नव्या संशोधानावरून असे दिसून येते की प्राचीन जगातील हे आश्चर्य (गिझाचे पिरॅमिड) 1,00,000 गुलामांनी नव्हे तर कुशल पगारदार कामगारांनी बांधले होते. हे सर्व कुशल कामगार आणि अभियंते कठोर शासनाखाली काम करत होते.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांना पिरॅमिडच्या दक्षिणेस काही थडगी सापडली आहेत. ज्यामध्ये कामगारांची हत्यारे आणि पुतळे आहेत. यावरून असे दिसून येते की, दगडांचे मोठे तुकडे येथे आणले गेले होते आणि येथे ठेवले गेले होते. दगड-मातीपासून बनवलेल्या रॅम्प सिस्टीमचा वापर करून चुनखडी 1,000 फूट अंतरावरून इमारतीत आणण्यात आली. डॉ. झही हवास यांनी सांगितले की त्यांच्या संशोधनातील निष्कर्षांवरून पुष्टी होते की, गिझा पिरॅमिड बांधणारे गुलाम नव्हते. जर ते गुलाम असते तर त्यांना पिरॅमिडजवळ कधीच पुरले नसते. त्यांच्या कबरीत त्यांची हत्यारेच ठेवली गेली नाहीत तर त्यांची नावेही कोरलेली होती. यावरून सत्ताधीश त्यांच्याबद्दल किती आदर दाखवत होते हे दिसून येते. गुलामांसाठी हा आदर शक्य नव्हता. हवास म्हणतात की, या शोधाबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे काही थडग्यांवर ‘पिरॅमिडच्या बाजूचा पर्यवेक्षक’ आणि ‘आर्किटेक्ट’ सारख्या पदव्या सापडल्या आहेत. यावरून असे दिसून येते की, त्या काळातील राजवटीतही या पिरॅमिड बांधणार्यांचा प्रभाव होता. या नवीन शोधामुळे जुना दावा मोडला जात आहे की, गिझा पिरॅमिड लाखो गुलामांनी बांधले होते. त्यांनी असेही म्हटले की, केवळ प्रशिक्षित इजिप्तशास्त्रज्ञच शोधात सापडलेल्या लेखनशैलीचे अचूक अर्थ लावू शकतात. अशा परिस्थितीत, येत्या काळात यावर आणखी काही दावे येऊ शकतात, असे हवास म्हणाले.