वॉशिंग्टन : मानवाला जेव्हापासून समजू लागले तेव्हापासून त्याला एकच भीती सतावू लागली आहे. ती म्हणजे जर पृथ्वी नष्ट झाली तर मानवी जीवनही संपुष्टात येईल. हेच संकट नजरेसमोर ठेवून सध्या मानव दुसर्या ग्रहांपर्यंत यान पाठवू लागला आहे. तसेच या ग्रहांवर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या शक्यतांचा अभ्यास करू लागला आहे. यासंबंधीचाच एक प्रयत्न म्हणून शास्त्रज्ञ आता चंद्रावर मानवी स्पर्म आणि लाखो जीवांची अंडी चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहेत.
या शास्त्रज्ञांच्या मते, चंद्र हा कायमस्वरूपी राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही. मात्र, याचा वापर आपली मौल्यवान संसाधने सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्टोअरेज युनिटच्या रूपात करता येऊ शकतो. 'न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार शास्त्रज्ञांनी चंद्रावर एक जीन बँकची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या बँकेमध्ये मानवाबरोबरच पृथ्वीवर आढळणार्या तब्बल 67 लाख जीवांच्या प्रजननासंबंधीच्या कोशिका, स्पर्म आणि अंडी ठेवले जाऊ शकते.
चंद्रावर तयार होणार्या या जीन बँकेला एक आधुनिक वैश्विक इन्शुरन्स पॉलिसीच्या रूपात पाहिले जाऊ लागले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाचे इंजिनिअर जेकान थांगा यांनी ही जीन बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या मते, लाखो जीवांची अंडी आणि स्पर्म चंद्रावर पाठवून तेथे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. मात्र, या प्रस्तावाची अंमलबजावणी लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे.