Obese Leopard | ‘त्या’ लठ्ठ बिबट्याचे वजन घटवण्याचे प्रयत्न थांबवले!

Obese Leopard |
Obese Leopard | ‘त्या’ लठ्ठ बिबट्याचे वजन घटवण्याचे प्रयत्न थांबवले!
Published on: 
Updated on: 

बीजिंग : आपल्या गोलमटोल आणि गुबगुबीत शरीरयष्टीमुळे इंटरनेटवर खळबळ उडवून देणाऱ्या १९ वर्षीय बिबट्याला आता वजन कमी करण्याच्या कसरतीतून विश्रांती मिळणार आहे. नैऋत्य चीनमधील पान्झिहुआ प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी 'पॅन बाओबाओ' या बिबट्याचे वजन कमी करण्याचे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्धापकाळात त्याचे आरोग्य आणि आराम यांनाच सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सिचुआन प्रांतातील या प्राणिसंग्रहालयात राहणारा हा बिबट्या २०२४ मध्ये पहिल्यांदा व्हायरल झाला होता. पर्यटकांनी त्याच्या स्थूल शरीराचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांना डिस्नेच्या 'झूटोपिया' या ॲनिमेटेड चित्रपटातील गुबगुबीत चित्ता 'ऑफिसर क्लॉहाउझर' याची आठवण झाली. या तुलनेमुळे पॅन बाओबाओ रातोरात सेलिब्रिटी बनला आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले. सीएनएनच्या एका अहवालातही या १९ वर्षीय बिबट्याचा उल्लेख इंटरनेटवरील 'बॉडी-पॉझिटिव्हिटी आयकॉन' असा करण्यात आल्याने त्याची ही कहाणी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे.

क्लाउझरशी तुलना होत असली तरी पॅन बाओबाओ हा चित्ता नसून बिबट्या आहे. बिबट्यांच्या आयुर्मानानुसार १९ वर्षे हे अत्यंत वृद्ध वय मानले जाते. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, त्याचे हे वय माणसाच्या ७० ते ८० वर्षांच्या बरोबरीचे आहे. या टप्प्यावर त्याचे वजन आणखी कमी करण्याचा प्रयत्न केल्यास फायद्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये या बिबट्याच्या लठ्ठपणाची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याच्यासाठी वजन घटवण्याचा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत कर्मचाऱ्यांनी त्याच्या खाण्याच्या वेळापत्रकात बदल केले होते आणि त्याला अधिक हालचाल करण्यास प्रोत्साहित केले होते. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर वयस्कर प्राण्यावर वजन कमी करण्याचा ताण न देण्याचे ठरवून हा उपक्रम थांबवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.