

वॉशिंग्टन : कर्करोग हा आजार गेल्या अनेक दशकांपासून संपूर्ण जगासाठी एक मोठे आव्हान ठरला आहे. यावर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू असले, तरी आतापर्यंत त्यात मोठे यश मिळाले नव्हते. मात्र, आता या दिशेने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक अशी mRNA लस विकसित केली आहे, जी कर्करोगाचा नायनाट करण्याची क्षमता ठेवते.
ही लस ट्यूमरच्या विरोधात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. उंदरांवरील चाचणीत या लसीने अत्यंत प्रभावी परिणाम दाखवले आहेत, मात्र मानवी शरीरावर तिचे नेमके परिणाम कसे होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, या लसीचा प्रयोग उंदरांवर ‘इम्यून चेकपॉइंट इनहिबिटर इम्युनोथेरपी’ औषधांसोबत करण्यात आला. या प्रयोगात उंदरांमध्ये एक शक्तिशाली ट्यूमर-विरोधी प्रभाव दिसून आला.
या लसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती कोणत्याही विशिष्ट ट्यूमर प्रोटिनला लक्ष्य करत नाही. त्याऐवजी, ती संपूर्ण रोगप्रतिकारशक्तीलाच कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी तयार करते. उंदरांवरील यशस्वी प्रयोगानंतर आता लवकरच मानवांवर याची चाचणी सुरू केली जाणार आहे. या संशोधनाचे प्रमुख आणि फ्लोरिडा विद्यापीठातील ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) डॉ. एलियास सयूर यांनी सांगितले की, ‘या शोधामुळे शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीवर अवलंबून न राहता कर्करोगावर उपचार करण्याची एक नवीन पद्धत समोर येऊ शकते. ‘सध्या ही लस मानवांवर वापरली गेली नसली, तरी जर उंदरांप्रमाणेच मानवांवरही तिचे सकारात्मक परिणाम दिसून आले, तर कर्करोगावरील लस बनवण्याचा मार्ग मोकळा होईल. या गंभीर आजारावर मात करण्यासाठी हे एक मोठे आणि क्रांतिकारी पाऊल ठरू शकते.