

न्यूयॉर्क : पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता ती सूर्याभोवतीसुद्धा फिरते. शास्त्रीय भाषेत या दोन्ही क्रियांना ‘परिभ्रमण’ आणि ‘परिक्रमण’ अशी नावं देण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पृथ्वीची ही गती समान नसून, कैक वर्षांपासून वैज्ञानिकसुद्धा यासंदर्भातील संशोधन करताना दिसत आहेत. ग्रहांची परिक्रमण गती बदलत असते, ही बाब त्यांच्या लक्षात आली आहे. पृथ्वीच्या गतीचा अक्षही बदलत असल्याचे दिसून आले आहे.
जियोफिजिकल रिसर्च लेटर्सनं नुकताच एक निरीक्षणपर अहवाल जारी केला. ज्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत मानवी हस्तक्षेपाचा थेट पृथ्वीच्या ग्रहमालेतील स्थानावरच कसा परिणाम होत आहे, याची गंभीर माहिती जारी केली आहे. सिंचनपद्धती आणि शहरीकरणामुळं मोठ्या प्रमाणात भूजलाची पातळी खालावत आहे हा मुद्दा अहवालात जाणीवपूर्वक अधोरेखित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 1993 ते 2010 दरम्यान साधारण 2150 गीगाटन भूजलसाठा कमी झाला आणि तो समुद्रात जाऊन मिळाला.
ज्यामुळं नैसर्गिकरीत्या पृथ्वीवरील जलस्तर वाढत असून, त्यामुळे पृथ्वीच्या गतीचा अक्ष आपलं स्थान बदलत आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर, पृथ्वी काहीशी तिरपी झाली आहे. सेऊल राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधक की-वियन सेओ यांनी हा निरीक्षणपर अहवाल लिहिला असून, मानवाकडून सातत्यानं होणारा आणि वाढणारा भूजलाचा वापर पृथ्वीच्या अक्षालाच कशा पद्धतीन अस्थिर करू शकतो हे स्पष्ट होत आहे. सेओ यांच्या माहितीनुसार यात नैसर्गिक कारणांमध्ये जमिनीतील पाण्याचं मूळ स्थान नाहीसं होणं पृथ्वीचा अक्ष अस्थिर होण्यामागचं मुख्य कारण असू शकतं. यासाठी त्यांच्या टीमनं 1993 ते 2010 पर्यंतच्या आकडेवारीचा आधार घेतला.
‘नासा’च्या 2016 मधील एका संशोधनावर, हे नवे अहवाल आधारित असून, पृथ्वीवरील पाण्याची असमान विभागणी या ग्रहाच्या गतीला प्रभावित करू शकते, असं म्हटलं गेलं होतं. ‘अक्ष’ ही एक काल्पनिक रेषा आहे, जी पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाते आणि पृथ्वी या रेषेभोवती फिरते. या फिरण्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते. पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो थोडा कललेला आहे, ज्यामुळे ऋतू बदलतात. शेती किंवा इतर काही कारणास्तव जमिनीअंतर्गत पाणी पंपाद्वारे काढण्यात येतं तेव्हा ते नाहीसं होत नाही.
तर, ते समुद्रात पोहोचतं आणि समुद्राचा जलस्तर वाढतो. अध्ययनानुसार 17 वर्षांमध्ये यामुळं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत 0.24 इंचांनी वाढ झाली असून, पाहण्यात हा आकडा लहान असला तरीही जागतिक स्तरावर दूरगामी परिणाम करणारा आहे, हे नाकारता येत नाही. मानवी हव्यासातून आणि सततच्या गरजांतून निसर्गावर घाला घालण्याचं हे सत्र थांबवता येणं शक्य नसलं, तरीही त्याचा वेग मात्र मंदावला पाहिजे, हेच आता संशोधकही सांगताना दिसत आहेत.