

कॅनबेरा : थंड आणि बर्फाच्छादित प्रदेशांत होणार्या ‘ग्लेशियल अर्थक्वेक’ म्हणजेच ‘हिमनदी भूकंपां’ बाबत एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. उत्तर गोलार्धात 20 वर्षांपूर्वी अशा भूकंपांचा शोध लागला होता; मात्र आता अंटार्क्टिकामध्येही शेकडो वेळा असे भूकंप झाल्याचे पुरावे वैज्ञानिकांनी सादर केले आहेत.
जेव्हा हिमनद्यांमधील (ग्लेशियर्स) बर्फाचे अवाढव्य कडे तुटून समुद्रात पडतात, तेव्हा हे विशेष प्रकारचे भूकंप निर्माण होतात. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, 2010 ते 2023 या काळात अंटार्क्टिकामध्ये अशा शेकडो घटनांची नोंद झाली आहे. हे भूकंप प्रामुख्याने ‘थ्वाइटस् ग्लेशियर’ च्या टोकावर होत असल्याचे आढळले आहे. या हिमनदीला ‘डूम्सडे ग्लेशियर’ (प्रलय आणणारी हिमनदी) असे म्हटले जाते, कारण जर ही हिमनदी कोसळली, तर जगभरातील समुद्रपातळीत प्रचंड वेगाने वाढ होऊ शकते.
भूकंप होण्याची प्रक्रिया : जेव्हा हिमनदीच्या टोकाकडून उंच आणि पातळ हिमनग तुटून समुद्रात पडतात, तेव्हा ते उलटतात. हे हिमनग उलटताना मुख्य हिमनदीवर जोरदार आदळतात. या आघातामुळे जमिनीमध्ये तीव्र कंपनं किंवा भूकंप लहरी निर्माण होतात, ज्या हजारो किलोमीटरपर्यंत पसरतात. सामान्य भूकंप, ज्वालामुखी किंवा अणुस्फोटांच्या तुलनेत ‘ग्लेशियल अर्थक्वेक’ वेगळे असतात. त्यांच्यामध्ये ‘हाय-फ्रि क्वेन्सी’ (उच्च वारंवारता) लहरी नसतात. सामान्यतः भूकंपांचे स्थान निश्चित करण्यासाठी याच लहरींची मदत घेतली जाते. मात्र, या लहरींच्या अभावामुळेच अनेक दशकांपासून इतर भूकंपांची नोंद होत असतानाही हिमनदी भूकंपांचा शोध उशिराने लागला.